

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच अमेरिका दौऱ्यावर जाणार असल्याचे शुक्रवारी, परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. भारत आणि अमेरिका दोन्ही देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याच्या नियोजनावर काम करत असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले. तसेच २६/११ च्या हल्ल्यातील दहशतवादी तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणासाठी प्रक्रियात्मक मुद्द्यांवर अमेरिकेसोबत चर्चा सुरु असल्याचे जयस्वाल यांनी सांगितले.
परराष्ट्र मंत्रालयाच्या साप्ताहिक पत्रकार परिषदेत जयस्वाल म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या विशिष्ट तारखा निश्चित केल्या जात आहेत आणि योग्य वेळी त्या जाहीर केल्या जातील. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी दूरध्वनीवरून चर्चा केली. भारत-अमेरिका व्यापक जागतिक धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी पंतप्रधानांच्या अमेरिकेच्या भेटीवर काम करत असल्याचे ते म्हणाले.
तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणासाठी भारत अमेरिकेसोबत चर्चा करत आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने राणांची याचिका फेटाळली आहे. २८ जानेवारी रोजी अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने सांगितले की, ते सध्या तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाबाबत पुढील पावले उचलत आहेत. २६/११ च्या मुंबई हल्ल्यातील गुन्हेगारांना न्याय मिळवून देण्यासाठी भारताच्या प्रयत्नांना अमेरिकेने दीर्घकाळ पाठिंबा दिला आहे, असे जयस्वाल म्हणाले.