PM Narendra Modi | जागतिक संकट भारत समर्थपणे पेलेल

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’मधून मानले नागरिकांचे आभार
PM Narendra Modi |
PM Narendra Modi | जागतिक संकट भारत समर्थपणे पेलेल
Published on
Updated on

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थिती आणि जागतिक संकटाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी शक्य असल्यास काही काळासाठी सोने खरेदी टाळावी, अनावश्यक परदेश प्रवास पुढे ढकलावा, कार-पूलिंगचा अवलंब करून इंधन बचत करावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले होते. रविवारी ‘मन की बात’मध्ये मोदींनी या आवाहनाला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे सांगत जनसहभागाच्या बळावर भारत हे संकटही समर्थपणे पेलू शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान मोदी म्हणाले, "माझ्या आवाहनाला देशातील प्रत्येक नागरिकाने केवळ पाठिंबाच दिला नाही, तर प्रत्यक्ष सहकार्यही केले, याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. अनेक कुटुंबांनी घरातील विवाहसमारंभासाठी नवे सोने खरेदी न करण्याचा निर्णय घेतला. गरज भासल्यास ते जुन्या सोन्याचा पुनर्वापर करणार आहेत. अनेकांनी कारपूलिंगचे सकारात्मक अनुभवही माझ्यासोबत शेअर केले. अनेकांनी परदेश दौरे पुढे ढकलले. आपण भारतीय या संकटाचा एकजुटीने सामना करत आहोत, याचा मला आनंद आहे."

संरक्षणसिद्धतेत वाढ

पंतप्रधान मोदी म्हणाले की, स्वदेशी लाँग रेंज लँड अटॅक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी आणि ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत तयार केलेल्या सी-२९५ विमानाच्या पहिल्या यशस्वी उड्डाणाचा त्यांनी उल्लेख केला. देशात सध्या अशी ४० हून अधिक विमाने तयार केली जात आहेत.

मातीच्या गणेशमूर्ती खरेदी करा...

पंतप्रधान म्हणाले की, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पीओपीच्या मूर्तीऐवजी मातीच्या मूर्तींचीच खरेदी करावी, असे आवाहनही मोदी यांनी केले.

योगासन स्पर्धेत भारताचे यश

अहमदाबाद येथे झालेल्या विश्व योगासन स्पर्धेत भारताने एकूण ११४ पदके जिंकली आहेत. त्यापैकी १०२ सुवर्णपदके जिंकत पदकतालिकेत अव्वल स्थान पटकावले. यंदा जगभरातील २,५०० हून अधिक ठिकाणी योग दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित झाल्याचेही त्यांनी नमूद केले. मोदींनी आसाममधील ‘हरगिला आर्मी’ने दुर्मीळ हरगिला पक्ष्याबाबतचा अंधविश्वास दूर करून संवर्धनासाठी केलेल्या कार्याचे कौतुक केले. मेघालयातील जिवंत रूट ब्रिजचा जागतिक वारसा यादीत समावेश व्हावा, यासाठी प्रस्ताव सादर केल्याचे सांगितले. बिहारमधील नालंदा विद्यापीठाने पुन्हा सुरू केलेल्या शास्त्रार्थ परंपरेचे, दिल्लीतील सेंट्रल संस्कृत विद्यापीठाच्या एआय आणि डेटा सायन्स अभ्यासक्रमाचे तसेच मध्य प्रदेशातील महिलांनी प्लास्टिक कचऱ्यापासून इको-ब्रिक्स तयार करण्याच्या उपक्रमाचेही मोदींनी कौतुक केले.

नांदेडच्या कुटुंबाचे कौतुक

नांदेड जिल्ह्यातील बहादूरपुरा गावात पेठकर कुटुंबाने विवाह सोहळ्यानिमित्त गावातील ३५०० नागरिकांसाठी प्रत्येकी एक लाख रुपयांच्या अपघात विम्याची व्यवस्था केली. या उपक्रमाचे पंतप्रधानांनी कौतुक केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news