

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) सोमवारी फ्रान्स आणि अमेरिकेच्या दौऱ्यासाठी रवाना झाले. १० फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारी असा तीन दिवसांचा पंतप्रधान मोदी यांचा फ्रान्स दौरा असेल. त्यानंतर त्यांचा २ दिवसांचा अमेरिका दौरा आहे. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांची राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाल्यावर पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच दौरा आहे. या दोन देशांच्या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, फ्रान्सच्या भेटीदरम्यान ते पॅरीसमध्ये एआय शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. (PM Modi USA visit)
पंतप्रधान मोदी म्हणाले की, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी दिलेल्या निमंत्रणानुसार मी १० ते १२ फेब्रुवारी या दरम्यान फ्रान्सला भेट देणार आहे. पॅरिसमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ताविषयक कृती शिखर परिषदेचे सहअध्यक्षपद भूषविण्यासाठी उत्सुक आहे. या शिखर परिषदेत जगभरातील नेते आणि तंत्रज्ञान क्षेत्रातले जगभरातले अनेक मुख्य कार्यकारी अधिकारी एकत्र येणार आहेत, असे ते म्हणाले. या शिखर परिषदेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा व्यापक सार्वजनिक हितासाठी सर्वसमावेशक, सुरक्षित आणि विश्वासार्ह पद्धतीने वापर करण्यासंबंधीच्या परस्पर सहकार्याच्या दृष्टिकोनावर विचारांची देवाणघेवाण होणार असल्याचे ते म्हणाले.
या दौऱ्यातील द्विपक्षीय भेटींच्या नियोजनाअंतर्गत, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्यासोबत भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारीसाठी २०४७ होरायझन रोडमॅपसंबंधीच्या प्रगतीचा आढावा घेतला जाणार असल्याचे ते म्हणाले. फ्रान्समधील मार्सेल या शहरात पहिल्या भारतीय वाणिज्य दूतावासाचे उद्घाटन, थर्मोन्यूक्लिअर एक्सपेरिमेंटल रिअॅक्टर प्रकल्पाला भेट, यूद्ध स्मारकाला भेट देऊन पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या भारतीय सैनिकांनाही ते श्रद्धांजली अर्पण करणार आहेत.
फ्रान्सचा दौरा आटोपल्यानंतर पंतप्रधान मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निमंत्रणाला प्रतिसाद म्हणून २ दिवसांच्या अमेरिका दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. मी माझे मित्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना भेटण्यासाठी उत्सुक आहे, असे ते म्हणाले. ही भेट दोन्ही देशांमधील परस्पर सहकार्याच्या यशाच्या पायावर नवी उभारणी करण्याची तसेच तंत्रज्ञान, व्यापार, संरक्षण, ऊर्जा आणि पुरवठा साखळीतील लवचिकता या क्षेत्रांसह दोन्ही देशांमधील परस्पर भागीदारीला नवी उंची मिळवून देण्यासाठी तसेच ती अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यक्रम आखण्याची संधी असणार आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.