.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या कुवेत दौऱ्यावर रवाना झाले आहेत. कुवेतचे शेख मेशाल अल अहमद अल जबर अल सबाह यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधानांनी कुवेतला भेट दिली आहे. मागील 43 वर्षांतील भारतीय पंतप्रधानांची कुवेतची ही पहिलीच भेट आहे. कुवेतला रवाना होण्यापूर्वी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये पीएम मोदींनी लिहिले की, 'भारत आणि कुवेत हे केवळ व्यापार आणि ऊर्जा भागीदार नाहीत, तर पश्चिम आशियातील शांतता, सुरक्षा आणि स्थैर्यामध्येही त्यांचे समान हित आहे. पिढ्यानपिढ्या असलेल्या कुवेतसोबतच्या आमच्या ऐतिहासिक संबंधांना आम्ही खूप महत्त्व देतो.
या भेटीमुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ होतील, असे पंतप्रधानांनी लिहिले. पंतप्रधान कुवेतचे अमीर, युवराज आणि पंतप्रधान यांची भेट घेणार आहेत. आज कुवेतला पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदी संध्याकाळी भारतीय वंशाच्या लोकांना भेटणार आहेत. कुवेतमध्ये अरेबियन गल्फ कपच्या उद्घाटन सोहळ्यालाही पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार आहेत.
पंतप्रधान मोदींच्या या भेटीपूर्वी दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1981 साली कुवेतला भेट दिली होती. 2009 मध्ये तत्कालीन उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनीही कुवेतला भेट दिली होती. भारत आणि कुवेतमध्ये ऐतिहासिक व्यापारी संबंध आहेत. कुवेतमध्ये तेलाचा शोध लागण्यापूर्वी भारत आणि कुवेतमध्ये खजूर आणि घोड्यांचा व्यापार होता. हा व्यापार भारताच्या पश्चिमेकडील बंदरांतून होत असे. पंतप्रधानांच्या दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये ऊर्जा, व्यापार, गुंतवणूक आणि सांस्कृतिक पैलूंवर महत्त्वपूर्ण चर्चा होऊ शकते. कुवेतमधील शेख साद अल अब्दुल्ला क्रीडा संकुलात 'हाला मोदी' कार्यक्रमाची तयारी सुरू आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी भारतीय वंशाच्या लोकांना संबोधित करणार आहेत.