नवी दिल्ली ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने ‘ऑपरेशन सिंदूर’चे यश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खास मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेची पटकथा आणि सादरीकरण दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देखरेखीखाली तयार करण्यात आले असून, पंतप्रधान मोदी स्वतः ‘ऑपरेशन सिंदूर’ची चित्तथरारक कहाणी कथन करणार आहेत.
केंद्र सरकारची ही मोहीम मास्टरस्ट्रोक मानली जात आहे. सरकारने तयार केलेला हा दस्तऐवज तेलुगू, बंगाली, गुजराती, आसामी, मल्याळम, मराठी, तमिळ, पंजाबी, कन्नड आणि ओडिया यासह दहा प्रमुख प्रादेशिक भाषांमध्ये लाँच करण्यात आला आहे. महाराष्ट्राला नजरेसमोर ठेवून हा व्हिडीओ मराठी भाषेत तयार करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे प्रादेशिक विविधता लक्षात घेऊन प्रादेशिक भाषांमध्ये व्हिडीओ आवृत्त्यादेखील तयार करण्यात आल्या आहेत. या व्हिडीओ संदेशात ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशाची माहिती स्वतः पंतप्रधान मोदी देत आहेत. त्यामुळे, त्याला थेट नेतृत्व संवादाचे स्वरूप देण्यात आले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ पंतप्रधान कार्यालयाच्या थेट देखरेखीखाली पंतप्रधान निवासस्थानी तयार करण्यात आला आहे. या प्रक्रियेत माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाचा समावेश करण्यात आला आहे. या मोहिमेशी संबंधित अचूक माहिती संरक्षण मंत्रालयाकडून गोळा करण्यात आली, तर माहिती आणि प्रसारण मंत्रालयावर याच्या प्रचाराची जबाबदारी देण्यात आली आहे. अन्य मंत्रालयांना या व्हिडीओच्या तयारीबद्दल कोणतीही कल्पनाही देण्यात आली नव्हती.
भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा ते ब्लॉक आणि बूथ पातळीपर्यंत पक्षाच्या सर्व संघटनात्मक घटकांना हा व्हिडीओ व्यापकपणे प्रसारित करण्याच्या स्पष्ट सूचना पक्षनेतृत्वाकडून देण्यात आल्या आहेत. ही मोहीम एवढी लोकप्रिय होईल की, ‘ऑपरेशन सिंदूर’ ही सरकारची मोठी उपलब्धी म्हणून सामान्य लोकांपर्यंत पोहोचेल आणि यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आणखी उजळून निघेल, अशी भाजपची अपेक्षा आहे.