

अयोध्या; पीटीआय : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (मंगळवार) अयोध्या दौर्यावर जाणार असून, रामजन्मभूमी मंदिराच्या बांधकामाची पूर्तता झाल्याचे प्रतीक म्हणून मंदिराच्या शिखरावर विधिवत भगवा ध्वज फडकवणार आहेत.
पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या निवेदनानुसार, हा काटकोन त्रिकोणी ध्वज दहा फूट उंच आणि वीस फूट लांब आहे. यावर ॐ सोबत कोविदार वृक्षाचे चित्र असून, भगवान श्रीरामाचे तेज आणि शौर्य दर्शवणारे तेजस्वी सूर्याचे प्रतीकही आहे. हा पवित्र भगवा ध्वज रामराज्याच्या आदर्शांना मूर्त रूप देत प्रतिष्ठा, एकता आणि सांस्कृतिक सातत्याचा संदेश देईल, असे पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे. हा ध्वज पारंपरिक उत्तर भारतीय नागर स्थापत्यशैलीत बांधलेल्या शिखरावर फडकवला जाईल. तर, मंदिराभोवती बांधलेला 800 मीटरचा परकोटा (प्रदक्षिणा मार्ग) दक्षिण भारतीय स्थापत्यशैलीत तयार करण्यात आला असून, तो मंदिराची स्थापत्यशास्त्रीय विविधता दर्शवतो, असेही निवेदनात म्हटले आहे.
आपल्या अयोध्या दौर्यादरम्यान पंतप्रधान सप्तमंदिराला भेट देतील. येथे महर्षी वशिष्ठ, महर्षी विश्वामित्र, महर्षी अगस्त्य, महर्षी वाल्मीकी, देवी अहिल्या, निषादराज गुह आणि माता शबरी यांच्याशी संबंधित मंदिरे आहेत. पंतप्रधान मोदी दुपारी सुमारे 12 वाजता अयोध्येतील पवित्र श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या शिखरावर विधिवत भगवा ध्वज फडकवतील. हे मंदिराच्या बांधकामाची पूर्तता आणि सांस्कृतिक उत्सव व राष्ट्रीय एकात्मतेच्या नव्या पर्वाची सुरुवात दर्शवेल, असे पंतप्रधान कार्यालयाच्या निवेदनात म्हटले आहे. त्याचबरोबर हजारो संत वैदिक मंत्रोच्चार, शंखनाद आणि घंटानादाने पंतप्रधानांचे अभिनंदन करतील. अयोध्याचे आमदार वेदप्रकाश गुप्त आणि भाजपचे ज्येष्ठ नेते कमलेश श्रीवास्तव यांनी रंगमहाल मंदिर, जगन्नाथ मंदिर, अमांवा मंदिरासह प्रमुख मंदिरांच्या महंतांची भेट घेऊन त्यांना विशेष आमंत्रित केले आहे.
हा कार्यक्रम मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला, श्रीराम आणि माता सीतेच्या विवाह पंचमीच्या अभिजित मुहूर्तावर होणार आहे. हा दिवस दिव्य मिलनाचे प्रतीक मानला जातो, असे निवेदनात म्हटले आहे. हा दिवस नववे शीख गुरू, गुरू तेग बहादूर जी यांचा बलिदान दिवसदेखील आहे. त्यांनी 17 व्या शतकात अयोध्येत 48 तास अखंड ध्यान केले होते. यामुळे या दिवसाचे आध्यात्मिक महत्त्व अधिक वाढते, असे पंतप्रधान कार्यालयाच्या निवेदनात म्हटले आहे.
मंदिर परिसरात, मुख्य मंदिराच्या बाहेरील भिंतींवर वाल्मीकी रामायणावर आधारित भगवान श्रीरामाच्या जीवनातील 87 प्रसंग दगडात सुबकपणे कोरलेले आहेत. तसेच, परकोटाच्या भिंतींवर भारतीय संस्कृतीतील 79 प्रसंग कांस्यधातूत साकारलेले आहेत. हे सर्व घटक मिळून सर्व भाविकांना एक अर्थपूर्ण आणि शैक्षणिक अनुभव देतात, ज्यामुळे भगवान श्रीरामाचे जीवन आणि भारताच्या सांस्कृतिक वारशाबद्दल सखोल माहिती मिळते, असे पंतप्रधान कार्यालयाच्या निवेदनात म्हटले आहे.
आरोग्य विभागातर्फे अयोध्या धाममध्ये सात ठिकाणी तात्पुरती वैद्यकीय शिबिरे उभारण्यात आली आहेत. श्रीराम रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालयाला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. सर्व वैद्यकीय कर्मचार्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. रामपथ आणि विमानतळापासून अयोध्या धामपर्यंत येणार्या सर्व मार्गांवर सजावट करण्यात आली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेदेखील दुपारी 2 ते 3 च्या दरम्यान अयोध्या धाममध्ये पोहोचतील.
रोड शो होणार असून, जिथे 5000 महिला थाळी-आरतीने त्यांचे स्वागत करतील. हा मुख्य कार्यक्रम 5 मिनिटे चालेल. या 5 मिनिटांत राम मंदिरावर 190 फूट उंचीवर धर्मध्वज फडकवला जाईल. या ध्वजारोहण कार्यक्रमात पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री योगी, मोहन भागवत आणि उत्तर प्रदेशच्या राज्यपाल सहभागी होतील.