

भावनगर : पीटीआय
भारताचा मुख्य शत्रू म्हणजे इतर राष्ट्रांवरील त्याचे अवलंबित्व आहे. त्यामुळे आत्मनिर्भरता हाच पर्याय आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेले टॅरिफ आणि व्हिसावरील निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी स्वदेशीचा नारा देत ‘चिप्सपासून जहाजांपर्यंत’ (सेमीकंडक्टर चिप्स ते जहाज) सर्व काही देशातच बनवण्याचे आवाहन केले.
‘समुद्रापासून समृद्धीकडे’ या कार्यक्रमाला संबोधित करताना, जिथे त्यांनी 34,200 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. मोदी म्हणाले, भारताच्या सर्व समस्यांवर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे आत्मनिर्भरता. भारत जागतिक बंधुत्वाच्या भावनेने पुढे जात आहे आणि आज जगात भारताचा कोणताही मोठा शत्रू नाही; पण खर्याअर्थाने भारताचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे इतर राष्ट्रांवरील अवलंबित्व आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले आणि या परावलंबित्वावर एकत्रितपणे मात केली पाहिजे. परकीय अवलंबित्व जितके जास्त, तितके राष्ट्रीय अपयश मोठे. जागतिक शांतता, स्थैर्य आणि समृद्धीसाठी जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशाने आत्मनिर्भर बनले पाहिजे.
स्वातंत्र्यानंतर तत्कालीन सत्ताधारी पक्षाने ‘लायसन्स राज’सारखे निर्बंध आणून तरुणांच्या प्रतिभेला दडपले. भारताच्या अंगभूत सामर्थ्याकडे सातत्याने दुर्लक्ष केल्यामुळे स्वातंत्र्यानंतर सहा-सात दशकांनंतरही देशाला अपेक्षित यश मिळू शकले नाही, असे मोदी म्हणाले. जागतिकीकरणाचे युग सुरू झाल्यावर तत्कालीन सरकारांनी केवळ आयातीवर लक्ष केंद्रित केले, ज्यामुळे हजारो कोटींचे घोटाळे झाले, असे मोदी म्हणाले. या धोरणांमुळे भारताच्या तरुणांचे मोठे नुकसान झाले आणि देशाची खरी क्षमता समोर येऊ शकली नाही, असेही ते म्हणाले.
चिप्स (सेमीकंडक्टर चिप्स) असोत किंवा शिप्स (जहाजे), आपण त्या भारतातच बनवल्या पाहिजेत. आजपासून देशातील सर्व प्रमुख बंदरांना अनेक कागदपत्रे आणि किचकट प्रक्रियांमधून मुक्त केले जाईल. ‘एक राष्ट्र, एक दस्तावेज’ आणि ‘एक राष्ट्र, एक बंदर’ प्रक्रियेच्या अंमलबजावणीमुळे व्यापार आणि वाणिज्य सुलभ होईल, असे त्यांनी सांगितले.