

लखनौ; वृत्तसंस्था : आमच्या सरकारने कलम 370 ची भिंत पाडली, याचा अभिमान आहे, या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी कलम 370 हटविल्याचे पुन्हा एकदा समर्थन केले. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त लखनौमध्ये राष्ट्र प्रेरणा स्थळाचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते झाले. त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत मोदी बोलत होते.
ते म्हणाले, भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने निर्माण केलेल्या सुशासनाचा वारसा आता केंद्र व राज्य पातळीवर नव्या उंचीवर नेला जात आहे. स्वातंत्र्यानंतर प्रत्येक कामगिरीचे श्रेय एकाच कुटुंबाला देण्याची प्रवृत्ती होती, ती कशी निर्माण झाली हे आपण विसरू नयेे. आमच्या सरकारने पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा अंत्योदय दृष्टिकोन आपले ध्येय म्हणून स्वीकारला आहे. सरकारी योजना कोणत्याही भेदभावाशिवाय सर्व गरिबांपर्यंत पोहोचतील, याची काळजी आम्ही घेत आहोत. 2014 पूर्वी सुमारे 25 कोटी लोकांचा समावेश सामाजिक सुरक्षा योजनांमध्ये होता. ही संख्या आज 95 कोटींपर्यंत वाढली आहे. भविष्यात उत्तर प्रदेश संरक्षण उत्पादनाचे कॉरिडॉर म्हणून जागतिक स्तरावर ओळखला जाईल. तो दिवस दूर नाही, असा विश्वासही मोदी यांनी यावेळी बोलून दाखवला.
मोदी हे अमृत काळाचे सारथी : योगी
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमृत काळाचे सारथी आहेत. स्वावलंबी आणि विकसित भारताचे शिल्पकार आणि जगातील सर्वांत लोकप्रिय नेते आहेत, अशा शब्दांत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोदी यांचा गौरव केला. श्यामाप्रसाद मुखर्जी, दीनदयाळ उपाध्याय आणि अटलबिहारी वाजपेयी यांनी भारताला एक नवी दिशा दिली. हा वारसा पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे नेत आहेत, असे योगी म्हणाले. दरम्यान, या कार्यक्रमासाठी आगमन होताच मोदी यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. ठिकठिकाणी तिरंगा फडकवत आणि त्यांच्या सन्मानार्थ घोषणा देत त्यांचे स्वागत करण्यात आले. पंतप्रधान मोदी यांच्यासह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आदी नेते होते.
असे आहे राष्ट्र प्रेरणास्थळ...
भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे जीवन आणि आदर्शांना वाहिलेल्या या ऐतिहासिक राष्ट्रीय स्मारक संकुल, राष्ट्र प्रेरणास्थळाची भव्य निर्मिती करण्यात आली आहे. येथे वाजपेयी, श्यामाप्रसाद मुखर्जी आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे 65 फूट उंच पुतळे उभारण्यात आले आहेत. शिवाय 98 हजार चौरस फूट जागेवर कमळाच्या आकारात डिझाईन केलेे एक अत्याधुनिक संग्रहालयाची निर्मितीही करण्यात आली आहे. या संग्रहालयाला मोदी यांनी इतर नेत्यांसह भेट दिली.