MANN KI BAAT : 'कारगिल विजय दिवस’ अभिमानाने भरून टाकणारा, शहीद जवानांना पंतप्रधान मोदींचा सलाम

‘मन की बात’च्या १३६व्या भागातून देशवासीयांशी संवाद
mann ki baat
mann ki baat
Published on
Updated on

नवी दिल्ली : कारगिल विजय दिवस हा आपल्याला अभिमानाने भरून टाकतो. कारगिलच्या वीर जवानांनी प्रत्येक आव्हानापेक्षा मोठे धैर्य दाखवत मातृभूमीच्या रक्षणासाठी सर्वस्व अर्पण केले, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी कारगिल युद्धातील शहीद जवानांना आदरांजली वाहिली. ‘मन की बात’च्या १३६व्या भागातून देशवासीयांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदी यांनी देशाच्या संरक्षण क्षमता, जलसंवर्धन, क्रीडा, अंतराळ संशोधन, विज्ञान आणि स्थानिक कलांना चालना देण्यावरही भर दिला.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, काही तारखा अशा असतात की त्या लक्षात ठेवण्यासाठी कॅलेंडर पाहण्याची गरज नसते. २६ जुलै ही अशीच एक तारीख आहे. यावेळी त्यांनी कारगिलच्या वीरांची शौर्यगाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘विशेष शौर्य विजय यात्रे’चाही उल्लेख केला. १४ जुलै रोजी दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकापासून सुरू झालेली मोटारसायकल यात्रा द्रास येथील कारगिल वॉर मेमोरियलपर्यंत जाणार आहे. ‘वन राइड, वन नेशन, वन सॅल्यूट’ हा या यात्रेचा संदेश आहे.

संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेवर भर

भारताची संरक्षण क्षमता आणि स्वदेशी तंत्रज्ञान वेगाने मजबूत होत आहे. भारतीय नौदलात नुकतेच दाखल झालेले आयएनएस महेंद्रगिरी हे भारतातच डिझाइन आणि निर्मिती करण्यात आले असून, त्यात ७५ टक्क्यांहून अधिक स्वदेशी सामग्री वापरण्यात आली आहे. तसेच डीआरडीओने पिनाका लाँग रेंज गाइडेड रॉकेट आणि कुशा मिसाइलच्या यशस्वी चाचण्या घेतल्याचेही त्यांनी सांगितले. संरक्षण उत्पादन असो, संरक्षण निर्यात असो किंवा मित्रदेशांसोबतचे राजनैतिक सहकार्य यामध्ये भारत सातत्याने नव्या उंचीवर पोहोचत आहे, असे मोदी म्हणाले. इंडोनेशियासोबत ब्रह्मोस आणि अस्त्र क्षेपणास्त्रांबाबत झालेल्या कराराचा उल्लेख करत त्यांनी भारतीय संरक्षण उपकरणे आणि तंत्रज्ञानावरील जगाचा विश्वास वाढत असल्याचे सांगितले.

जलसंवर्धनासाठी ‘कॅच द रेन’ अभियान

‘कॅच द रेन’ अभियानांतर्गत पावसाचे पाणी साठवणे, भूजल पुनर्भरण, जुन्या जलस्रोतांचे पुनरुज्जीवन आणि वृक्षारोपणाला चालना दिली जात आहे. आपल्या परिसरातील एखाद्या तलावाची, विहिरीची किंवा बावडीची जबाबदारी घेऊया. आज वाचवलेला पाण्याचा प्रत्येक थेंब हा भविष्यातील पिढ्यांसाठी मोठी संपत्ती आहे, असे आवाहन त्यांनी केले.

क्रीडा, विज्ञान आणि अंतराळ क्षेत्रातील भारतीय यशाचा गौरव

पी. व्ही. सिंधूने जपान ओपनचे विजेतेपद मिळवणारी पहिली भारतीय ठरल्याचा, तसेच भारतीय महिला क्रिकेट संघाने लॉर्ड्सवर पहिला कसोटी सामना जिंकल्याचा उल्लेख मोदी यांनी केला. फिजिक्स ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या सर्व पाच विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक जिंकून देशाला पहिले स्थान मिळवून दिल्याचे त्यांनी सांगितले. रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित ऑलिम्पियाडमधील भारतीय विद्यार्थ्यांच्या कामगिरीचेही त्यांनी कौतुक केले.

खासगी क्षेत्रातून विकसित भारताचा पहिला रॉकेट विक्रम-१ च्या यशस्वी प्रक्षेपणाचा उल्लेख करत मोदी यांनी भारतीय तरुण नवोन्मेषकांच्या कौशल्याचे आणि जिद्दीचे कौतुक केले. स्थानिक कौशल्यांना ‘व्होकल फॉर लोकल’ची जोड काश्मीरमधील पारंपरिक ‘वगू’ चटई, उत्तर प्रदेशातील महिलांनी तयार केलेली ‘विदुर प्रेरणा स्वदेशी हर्बल टी’, बिहारमधील प्लास्टिक कचऱ्यापासून तयार होणाऱ्या बेंच आणि त्रिपुरातील पारंपरिक ‘चौंगप्रांग’ वाद्याचा उल्लेख करत मोदी यांनी स्थानिक कौशल्य आणि परंपरांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले. हस्तकलेला प्रोत्साहन देऊया, आपल्या विणकरांचा सन्मान करूया आणि ‘व्होकल फॉर लोकल’ची भावना अधिक मजबूत करूया, असे मोदी म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news