नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा-
पंतप्रधान नरेंद्र मोदी खूप शक्तिशाली आहेत, मात्र ते देव नाहीत, असा निशाणा ‘आप’चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी (दि.26) साधला. दिल्ली विधानसभेच्या दोन दिवसीय अधिवेशनाला गुरुवारी सुरुवात झाली. केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी विधानसभेतील विरोधी पक्ष असलेल्या भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. अरविंद केजरीवाल म्हणाले की, त्यांना आणि मनीष सिसोदिया यांना विधानसभेत पाहून विरोधकांना दु:ख झाले आहे. पंतप्रधान मोदी हे खूप शक्तिशाली आहेत आणि त्यांच्याकडे भरपूर संसाधने आहेत. मात्र पंतप्रधान मोदी हे देव नाहीत तर खरा देव आमच्या सोबत आहे, असे ते म्हणाले.
भाजपने आमच्या ५ नेत्यांना तुरुंगात टाकले पण पक्ष तुटला नाही. त्यांच्या दोन नेत्यांना तुरुंगात टाका, त्यांचा पक्ष फुटेल असे ते म्हणाले. तुरुंगात गेल्याने केजरीवालांचे नुकसान झाले, असे भाजपला वाटते. मात्र माझे नुकसान झाले नसून दिल्लीतील २ कोटी लोकांचे नुकसान झाले आहे, असे यावेळी केजरीवाल म्हणाले. केजरीवाल म्हणाले की, २००६ मध्ये आयकर सह आयुक्त पदावरून, २०१४ मध्ये मुख्यमंत्रीपदाचा आणि आता पुन्हा २०२४ मध्ये मुख्यमंत्रीपदाचा, अशा तीन वेळा मी राजीनामा दिला आहे. कोणत्याही पदाचा लोभ नसल्याचे त्यांनी सांगितले. ७५ वर्ष झाल्यानंतर भाजपमध्ये नेता निवृत्त होण्याचा नियम आहे. मात्र, भाजपचा एक नेता स्वतःत निवृत्त होत नसल्याचा निशाणा त्यांनी पंतप्रधान मोदींवर नाव न घेता साधला. या अगोदरही त्यांनी या मुद्द्यावरुन सवाल केला आहे.