

पुढारी ऑनलाईन डेस्क : हरियाणा विधानसभा निवडणुकीत (Haryana Assembly Election Result) भाजपचे कमळ ही कमळ फुलले आहे. कात्यायनी देवीच्या हाती कमळ असून देवीचा आशीर्वाद मिळाला आहे. हरियाणाच्या मतदारांनी कमाल केली आहे. सलग तिसऱ्यांदा भाजपला विजयी करत नवा इतिहास निर्माण केला आहे. प्रत्येक जाती धर्माच्या लोकांनी भाजपला मतदान केले. त्यांचे मी आभार मानतो, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी आज (दि.८) दिली.
दिल्लीच्या भाजप मुख्यालयात हरियाणा विधानसभा निवडणुकीतील विजयाचा जल्लोष करण्यात आला. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ आदी उपस्थित होते. (Haryana Assembly Election Result)
पंतप्रधान पुढे म्हणाले की, हरियाणाच्या जनतेने भाजपला तिसऱ्यांदा विजय करून अभूतपूर्व काम केले आहे. छप्पर फाड के मतदान केले आहे. भाजपने काँग्रेसच्या कुशासनापासून मुक्ती दिली. जिथे भाजपचे सरकार स्थापन होते. तेथील जनता भाजपला खूप काळ समर्थन देते. हरियाणात विकासाची गॅरंटी कामी आली. कार्यकर्त्यांच्या मेहनतीला फळ आले आहे. जनतेने काँग्रेसला करारा जबाब दिला आहे. देशविरोधी राजकारण चालणार नाही, असे निक्षून सांगितले. काँग्रेसचा डब्बा गोल केला आहे. काँग्रेसने दलित, मागासवर्गीय, सैनिकांचा अपमान केला. त्याला जनतेने सडेतोड उत्तर दिले. काँग्रेस आज परजिवी बनली आहे.