

वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी त्यांच्या लोकसभा मतदारसंघातील वाराणसी रेल्वे स्थानकावरून चार नवीन वंदे भारत एक्स्प्रेस गाड्यांना झेंडा दाखवून देशसेवेत रुजू केले. पायाभूत सुविधा हा कोणत्याही विकसित देशाच्या आर्थिक प्रगतीचा आधार असतो, यावर जोर देत पंतप्रधान मोदींनी सांगितले की, भारताने विकासाच्या मार्गावर वेगाने वाटचाल सुरू केली आहे. वंदे भारत, नमो भारत आणि अमृत भारत यांसारख्या गाड्या नवीन पिढीच्या भारतीय रेल्वेचा पाया रचत आहेत, असे ते म्हणाले. या गाड्या भारतीयांनी भारतीयांसाठी बनवलेल्या आहेत, याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे, असेही त्यांनी नमूद केले.
* पायाभूत सुविधा हे देशाच्या प्रगतीचे मुख्य कारण आहे.
* वंदे भारत गाड्या भारतीय अभियांत्रिकी क्षमतेचे प्रतीक आहेत.
* धार्मिक स्थळे आता आधुनिक रेल्वे नेटवर्कने जोडली जात आहेत.
* काशी आता पूर्व उत्तर प्रदेशाची आरोग्य राजधानी बनली आहे.
पंतप्रधान मोदींनी यावेळी उत्तर प्रदेशात अध्यात्मिक पर्यटनामुळे आलेल्या विकासावर विशेष प्रकाश टाकला. काशी विश्वनाथाच्या दर्शनासाठी गेल्या वर्षी 11 कोटींहून अधिक भाविक आले होते. राम मंदिराच्या उद्घाटनानंतर आतापर्यंत 6 कोटींहून अधिक लोकांनी अयोध्येला भेट दिली आहे. या भाविकांच्या भेटीमुळे उत्तर प्रदेशच्या अर्थव्यवस्थेत हजारो कोटी रुपयांचे योगदान मिळाले आहे. यामुळे हॉटेल मालक, वाहतूकदार, स्थानिक कलाकार आणि नावाड्यांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत, असे सांगून ते म्हणाले, या तीर्थयात्रा केवळ दर्शनाचे मार्ग नसून त्या भारताच्या आत्म्याला जोडणार्या पवित्र परंपरा आहेत.
या नव्या गाड्यांमुळे प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होणार असून प्रादेशिक गतिशीलता आणि पर्यटनाला चालना मिळेल. 1) बनारस - खजुराहो, 2) लखनौ -सहारनपूर, 3) फिरोजपूर -दिल्ली, 4) एर्नाकुलम-बंगळुरू या गाड्या देशाच्या विविध भागांना आधुनिक कनेक्टिव्हिटी प्रदान करत विकसित भारत साकारण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहेत.
पंतप्रधानांनी सांगितले की, 10-11 वर्षांपूर्वी बीएचयू रुग्णालय हेच एकमेव मोठे केंद्र होते; परंतु आता महामना कर्करोग रुग्णालय, शंकरा नेत्रालय आणि अत्याधुनिक ट्रॉमा सेंटरमुळे काशी हे या भागाची आरोग्य राजधानी बनले आहे. आयुष्मान भारत आणि जनऔषधी केंद्रांमुळे लाखो गरीब रुग्णांचे कोट्यवधी रुपये वाचत आहेत.