

जम्मू/श्रीनगर; वृत्तसंस्था : जम्मू-काश्मीरमधील पवित्र अमरनाथ यात्रेला शुक्रवारी उत्साहात प्रारंभ झाला. बालटाल आणि पहलगाम या दोन्ही आधार शिबिरांतून पहिली तुकडी बाबा बर्फानींच्या पवित्र गुहेकडे रवाना झाली. त्यानंतर श्रीनगरमधील पंथा चौक आधार शिबिरातून दुसरी तुकडीही बालटालकडे प्रस्थान झाली. यात्रेला प्रारंभ होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व भाविकांना शुभेच्छा देत विशेष संदेश जारी केला.
अमरनाथ यात्रा ही ‘मोठा सन्मान आणि अविस्मरणीय आध्यात्मिक अनुभव’ असल्याचे त्यांनी म्हटले. बाबा बर्फानींचे दर्शन घेण्याची संधी ही प्रत्येक शिवभक्तासाठी अत्यंत पवित्र असल्याचे त्यांनी नमूद केले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, अमरनाथ यात्रा ही भारताच्या सनातन आध्यात्मिक परंपरेचा अविभाज्य आणि शाश्वत भाग आहे. दरवर्षी देश-विदेशातून लाखो शिवभक्त जम्मू-काश्मीरमध्ये येतात. विविध भाषा, संस्कृती आणि परंपरा असलेले भाविक महादेवाच्या दर्शनाच्या समान भावनेने एकत्र येतात. ही यात्रा भारताच्या ‘विविधतेत एकता’ या संस्कृतीचे जिवंत उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले.
यात्रेसाठी कार्यरत असलेल्या केंद्रीय राखीव पोलिस दल, जम्मू-काश्मीर पोलिस, भारत-तिबेट सीमा पोलिस, सीमा सुरक्षा दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, आरोग्य कर्मचारी, प्रशासन, स्वच्छता कर्मचारी आणि स्वयंसेवक यांचे पंतप्रधानांनी विशेष आभार मानले. त्यांच्या सेवेमुळे लाखो भाविकांना सुरक्षितपणे यात्रा करता येत असल्याचे त्यांनी म्हटले.
श्रीनगरमधील पंथा चौक आधार शिबिरातून भाविकांची आणखी एक तुकडी बालटालकडे रवाना झाली. सुरक्षा दलांच्या संरक्षणाखाली वाहनांचे ताफे मार्गस्थ करण्यात आले. यात्रेला जाण्याची संधी मिळणे हे आपले भाग्य असल्याची भावना अनेक भाविकांनी व्यक्त केली. यंदाची अमरनाथ यात्रा २८ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या दिवशी समाप्त होणार आहे.
यंदाच्या यात्रेदरम्यान प्रत्येक भाविकाने पाच संकल्प करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ते संकल्प असे...
* संपूर्ण यात्रेदरम्यान स्वच्छतेचे काटेकोर पालन करणे. परिसर स्वच्छ ठेवून पर्यावरणाचे रक्षण करणे.
* दुसरा संकल्प म्हणजे प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे, वाहतूक नियमांचे आणि सुरक्षा निर्देशांचे प्रामाणिकपणे पालन करणे. घसरडे रस्ते आणि प्रतिकूल हवामान लक्षात घेऊन अत्यंत सावधगिरी बाळगणे
* यात्रेनंतर प्रत्येकाने ‘एक पेड़ माँ के नाम’ अभियानांतर्गत एक रोपटे भेट द्यावे.
* ‘व्होकल फॉर लोकल’चा मंत्र देत, प्रवासाच्या एकूण खर्चापैकी किमान दहा टक्के रक्कम जम्मू-काश्मीरमधील स्थानिक उत्पादने खरेदी करण्यावर खर्च करण्याचे आवाहन
* पाचवा संकल्प म्हणून ‘नेशन फर्स्ट’ची भावना जपत वर्षभर आपल्या कर्तव्यांचे प्रामाणिकपणे पालन करून विकसित भारताच्या निर्मितीत सक्रिय योगदान द्यावे.