PM Modi Australia visit: ऑस्ट्रेलियाची 'बिग बॅश लीग' पहिल्यांदाच भारतात खेळवली जाणार; PM मोदींच्या मेलबर्न भेटीत घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक मेलबर्न क्रिकेट ग्राउंडला भेट दिली. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बेनीज यांच्यासह त्यांनी या मैदानाची पाहणी केली.
PM Modi Australia visit
PM Modi Australia visitANI
Published on
Updated on

PM Modi Australia visit

मेलबर्न: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशांमध्ये क्रिकेट हा केवळ खेळ नसून ती एक सामायिक आवड आहे, अशा भावना व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक मेलबर्न क्रिकेट ग्राउंडला भेट दिली. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बेनीज यांच्यासह त्यांनी या मैदानाची पाहणी केली.

या ऐतिहासिक भेटीदरम्यान ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अल्बेनीज यांनी एक मोठी घोषणा केली. ऑस्ट्रेलियाची प्रसिद्ध 'बिग बॅश लीग' पहिल्यांदाच भारतात खेळवली जाणार असून, या हंगामातील उद्घाटनाचा सामना १२ डिसेंबर रोजी चेन्नईत होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रीडा, व्यावसायिक आणि धोरणात्मक संबंधांना अधिक बळकटी देण्यासाठी दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी येथे एका विशेष 'क्रीडा सहकार्य आराखड्याचे' अनावरण केले.

'मैदानावर शेवटच्या षटकाचा दबाव नाही, तर मैत्रीचा आनंद'

यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, "कोणत्याही भारतीयासाठी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर पाऊल ठेवणे दोन वेगवेगळ्या भावना एकाच वेळी जागृत करते. पहिली भावना म्हणजे भारत-ऑस्ट्रेलिया सामन्याचा थरार आणि दुसरी म्हणजे, आपल्या दोन्ही देशांमध्ये क्रिकेट हा केवळ एक खेळ नसून ती एक सामायिक आवड आहे याची जाणीव. मात्र, आज मैदानावर 'शेवटच्या षटकातील थराराचा' कोणताही दबाव नाही. त्याऐवजी येथे केवळ खेळाचा आनंद, आपल्या मैत्रीची ऊब आणि भविष्यातील विजेत्यांची ऊर्जा पाहायला मिळत आहे."

चेन्नईत रंगणार 'बिग बॅश'चा थरार

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बेनीज म्हणाले की, "'मेलबर्न रेनेगेड्स' आणि 'पर्थ स्कॉर्चर्स' यांच्यातील बिग बॅशचा सलामीचा सामना चेन्नईत खेळवला जाईल. यासोबतच आठवडाभर चालणाऱ्या 'g'day नमस्ते' या ऑस्ट्रेलियन क्रीडा, संस्कृती आणि व्यावसायिक महोत्सवाची सुरुवात होईल. व्यापार, पर्यटन आणि क्रीडा विज्ञानाला चालना देण्यासाठी आम्ही हा नवा आराखडा आणत आहोत. आज आपल्या दोन्ही देशांमध्ये खेळ हा एक मोठा व्यवसायही झाला आहे." या महोत्सवासाठी 'बिझनेस कौन्सिल ऑफ ऑस्ट्रेलिया'चे एक उच्चस्तरीय शिष्टमंडळही भारतात येणार आहे.

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान म्हणाले की, " भारत २०३० च्या राष्ट्रकुल खेळांचे, तर ऑस्ट्रेलिया २०३२ च्या ऑलिम्पिकचे यजमानपद भूषवत आहे आणि भारताने २०३६ च्या ऑलिम्पिकसाठी बोली लावली आहे, ज्याला ऑस्ट्रेलिया नक्कीच पाठिंबा देईल. त्यामुळे आपल्यासमोर अधिक मैत्रीपूर्ण स्पर्धा आणि सर्वच स्तरांवर वाढीव सहकार्यासाठी संधीचे एक दशक आहे."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news