

सिंगूर /दिसपूर; वृत्तसंस्था : राज्यातील तृणमूल काँग्रेसच्या 15 वर्षांच्या महाजंगल राजचा अंत करण्याची वेळ आली आहे. पश्चिम बंगालला आता खर्या बदलाची (परिवर्तन) गरज असून, जनता ‘टीएमसी’च्या कुशासनाला कंटाळली आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस हल्लाबोल चढविला.
रेल्वे आणि बंदर प्रकल्पांसह विविध विकासकामांच्या अनावरणानंतर त्यांनी सिंगूर येथील सभेला संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, ‘टीएमसी’ ही राज्यातील तरुण, महिला, शेतकरी आणि मच्छीमारांची शत्रू आहे. केवळ भारतीय जनता पक्षच पश्चिम बंगालचा विकास वेगाने करू शकतो. आपल्याला आता खरा बदल हवा आहे. 15 वर्षांचे हे महाजंगल राज संपवण्यासाठी बंगाल आता तयार आहे. ‘भाजप केंद्रात सत्तेवर आल्यानंतरच बंगाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. ‘टीएमसी’ केंद्रात यूपीए सरकारचा भाग असतानाही त्यांना हे करता आले नाही,’ असा टोला त्यांनी लगावला. ‘टीएमसी’चा माझ्याशी आणि भाजपशी विरोध मी समजू शकतो; पण ते आपले शत्रूत्व बंगालच्या जनतेवर काढत आहेत आणि केंद्रीय योजना त्यांच्यापर्यंत पोहोचू देत नाहीत, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्र आणि केरळमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील यशाचा उल्लेख करत आसाममधील सभेत बोलताना पंतप्रधान म्हणाले, देशातील मतदारांचा भाजपवरचा विश्वास गेल्या दीड वर्षात सातत्याने वाढत आहे. मुंबईसारख्या शहरात, जिथे काँग्रेसचा जन्म झाला, तिथे आज हा पक्ष चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर फेकला गेला आहे. काँग्रेसकडे विकासाचा कोणताही अजेंडा नसल्यामुळे त्यांनी जनतेचा विश्वास गमावला आहे.
टीएमसी सरकार घुसखोरीला पाठिंबा देत असल्याचा आरोप करत मोदी म्हणाले की, केंद्राने सीमा कुंपणासाठी जमीन मागितली असूनही राज्य सरकार सहकार्य करत नाही. उलट, टीएमसी घुसखोरांना कागदपत्रे बनवून देण्यास मदत करत आहे.
पश्चिम बंगालच्या 294 सदस्यीय विधानसभेसाठी यंदा मार्च किंवा एप्रिल महिन्यांत निवडणुका होण्याची शक्यता आहे. यासोबतच तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरीमध्येही निवडणुका होणार आहेत.