

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा ः
भारताच्या शेजारील देशामध्ये हिंदूंची दुर्दशा होत आहे, तरीही या मुद्द्यावर जागतिक पातळीवर मौन बाळगले आहे, हा चिंतेचा विषय असल्याचे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या स्थापना दिन समारंभामध्ये बोलताना उपराष्ट्रपती धनखड यांनी विविध मुद्द्यावर वक्तव्य केले.
उपराष्ट्रपती जगदीप धनखड म्हणाले की, काही विघातक शक्ती भारताची प्रतिमा मलिन करण्याचे काम करत आहेत. अशा प्रयत्नांना निष्फळ करण्यासाठी, प्रतिहल्ला सुरू करणे आवश्यक आहे. भारताला मानवाधिकाराचा उपदेश देणाऱ्या देशांनी स्वतःच्या आत डोकावायला हवे, असे ते म्हणाले. उपराष्ट्रपतींनी देशाची फाळणी, आणीबाणी लागू करणे आणि १९८४ च्या शीखविरोधी दंगली या वेदनादायक घटना असल्याचे नमुद केले. उपराष्ट्रपतींनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरही आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले की, सीएएमुळे पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातील बिगर-मुस्लिम स्थलांतरितांना नागरिकत्व मिळू शकेल.
मानवाधिकाराचा वापर परराष्ट्र धोरणाचे साधन म्हणून किंवा इतरांवर प्रभाव टाकण्यासाठी केला जाऊ नये, असे धनखड म्हणाले. भारतातील शाळांमध्ये गोळीबार होत नाही मात्र स्वतःला विकसित देश समजणाऱ्या अमेरिकेतील शाळांमध्ये सर्रास गोळीबाराच्या घटना घडतात. त्यामुळे दुसऱ्या देशांना सल्ला देण्या अगोदर स्वतः आपल्या देशामध्ये डोकावून पाहणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
जागतिक भूक निर्देशांकाच्या माध्यमातून भारताची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यावेळी म्हणाले. कोरोना विषाणूच्या महामारीच्या काळात सरकारने जात-पात, धर्माचा विचार न करता ८० कोटींहून अधिक लोकांना मोफत अन्नधान्य दिल्याची आठवण त्यांनी करून दिली. उपराष्ट्रपती म्हणाले की, जगामध्ये "वाईट शक्ती" एका अजेंडाद्वारे चालविल्या जातात ज्यांना प्रसिद्धी मिळवायची इच्छा असलेल्या लोकांकडून "आर्थिकरित्या प्रोत्साहन" दिले जाते.