

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : देशातील बेरोजगारीवर तोडगा काढण्यासाठी इन्फोसिसचे संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती, फ्रॅक्टलचे सह-संस्थापक श्रीकांत वेलामकाणी, बीसीजी इंडियाचे प्रमुख राहुल जैन, मॅकिन्सेचे माजी वरिष्ठ भागीदार रजत गुप्ता आणि नेटवर्क 18 ग्रुपचे अध्यक्ष आदिल झैनुलभाई यांच्यासारख्या दिग्गज उद्योगपतींनी कंबर कसली असून, येत्या दहा वर्षांत दहा कोटी रोजगारनिर्मिती करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.
सॉफ्टवेअर कंपन्यांची संघटना असलेल्या नॅसकॉमचे सहसंस्थापक हरिश मेहता, द इंडस आंत्रप्रिन्युअरचे संस्थापक ए. जे. पटेल, सेंटर फॉर इनोव्हेशन इन पब्लिक पॉलिसीचे संस्थापक के. यतिश राजावत यांनी संयुक्तपणे या उपक्रमाची घोषणा केली आहे. कायदेविषयक तज्ज्ञ निशिथ देसाई, नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष राजीव कुमार यांचाही यामध्ये समावेश आहे. भारत ही वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असूनही रोजगारनिर्मितीत त्या तुलनेत वाढ होताना दिसत नाही. दरवर्षी देशात 1.2 कोटी रोजगारक्षम नागरिक तयार होत आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर तयार होणार्या मनुष्यबळास सामावून घेण्याची उत्पादन क्षेत्राची क्षमता नाही. देशातील या कार्यक्षम मनुष्यबळाचा वापर करून घेण्यासाठी दरवर्षी किमान 80 ते 90 लाख नोकर्या तयार कराव्या लागणार आहेत.
जगातील सर्वात वेगाने वाढणार्या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक असूनही, भारतात उत्पादनवाढीच्या तुलनेत रोजगारवाढ मंदावली आहे. ऑटोमेशन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता व्यवसायाचे प्रारूप उद्योगांना नव्याने आकार देत आहे. सर्वच क्षेत्रांमध्ये सुरुवातीच्या स्तरावरील नोकर्या त्यामुळे कमी होत आहेत. त्यामुळे आर्थिक वाढ रोजगारनिर्मितीपासून अधिकाधिक विलग होऊ शकते, अशी चिंता व्यक्त होत आहे. दहा कोटी रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट कौशल्ये, उद्योग, डेटा आणि धोरणांना एकत्र करण्याचे आहे. त्यामुळे उद्योजक, एमएसएमई आणि मालक यासारख्या रोजगार निर्माण करणार्यांना बळकट केले जाईल. यातून पुढील पिढीसाठी सन्मानजनक उपजीविका निर्माण करता येईल, असे मेहता यांनी एका निवेदनात म्हटले आहे.
स्टार्टअप्स आणि लघू उद्योगांचा देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (जीडीपी) सुमारे 30 टक्के वाटा असून, ते सर्वात मोठे रोजगारदाते आहेत. त्यामुळे त्यांचा विस्तार प्रमुख शहरांच्या पलीकडे करणे आवश्यक आहे. जर भारतात दरवर्षी 8-9 दशलक्ष नोकर्या निर्माण करायच्या असतील, तर काही संरचनात्मक अडथळे दूर करणे आवश्यक आहे, जेणेकरून उद्योजकता हा अनेकांसाठी एक महत्त्वाकांक्षेचा विषय बनेल. हे एक रोजगारनिर्मितीचे प्रभावी माध्यम ठरेल, असे द इंडस आंत्रप्रिन्युअरचे संस्थापक ए. जे. पटेल यांनी सांगितले.
पुढील दहा वर्षांत दहा कोटी रोजगार हा उपक्रम उद्योग, नागरी समाज आणि सरकारमधील धुरिणांच्या पाठिंब्याने सुरू करण्यात आला आहे. या घोषणेच्या सनदेवर स्वाक्षरी करणार्यांमध्ये इन्फोसिसचे संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती, नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष राजीव कुमार, मॅकिन्सेचे माजी वरिष्ठ भागीदार रजत गुप्ता, फ्रॅक्टलचे सह-संस्थापक श्रीकांत वेलामकाणी, कायदेविषयक तज्ज्ञ निशिथ देसाई, बीसीजी इंडियाचे प्रमुख राहुल जैन आणि नेटवर्क 18 ग्रुपचे अध्यक्ष आदिल झैनुलभाई यांचा समावेश आहे.