

जम्मू : जम्मू जिल्ह्यात एका धक्कादायक घटनेत सुरक्षा दलांनी आर. एस. पुरा येथील आंतरराष्ट्रीय सीमेवर एका कबुतराला पकडले आहे, ज्याच्या पायाला धमकीची चिठ्ठी बांधलेली होती. अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे कबूतर 18 ऑगस्ट रोजी रात्री 9 च्या सुमारास कटमारिया परिसरात पकडण्यात आले.
उर्दू आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये लिहिलेल्या या चिठ्ठीत जम्मू रेल्वे स्टेशनला आयईडी स्फोटकांनी उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. त्यावर काश्मीरची स्वतंत्रता आणि वेळ आली आहे अशा चिथावणीखोर ओळीही लिहिलेल्या होत्या. अधिकार्यांनी सांगितले की, पाकिस्तानने यापूर्वी फुगे, झेंडे आणि कबुतरांसारख्या अपारंपरिक पद्धतींचा वापर करून सीमेपलीकडून विविध संदेश पाठवले आहेत. मात्र, थेट दहशतवादी धमकी देणारे कबूतर या प्रदेशात पकडण्याची ही पहिलीच वेळ आहे. सीमेपलीकडून उडून आल्याचे मानले जाणारे हे कबूतर एका महत्त्वाच्या ठिकाणाच्या सुरक्षेला धोका निर्माण करणारा गंभीर संदेश घेऊन आले होते. आम्ही हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेत आहोत.