नवी दिल्ली; वृत्तसंस्था : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेने आपल्या कोट्यवधी सदस्यांसाठी दावा निवारण प्रक्रिया अधिक वेगवान करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत केवळ 5 लाख रुपयांपर्यंतच्या आगाऊ रकमेसाठी उपलब्ध असलेली स्वयंचलित निवारण पद्धत आता निवृत्तीनंतरचे अंतिम पैसे काढण्यासाठीही लागू केली जाणार आहे. या प्रक्रियेमुळे निवृत्तीनंतरचा निधी आता अवघ्या तीन दिवसांत थेट बँक खात्यात जमा होऊ शकेल. यामुळे खातेदारांना पैशांसाठी अनेक आठवडे किंवा महिने वाट पाहावी लागणार नाही.
नोकरी बदलणार्या कर्मचार्यांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे, आता पीएफ हस्तांतरित करण्यासाठी स्वतंत्र अर्जाची गरज उरणार नाही. ईपीएफओ अशी यंत्रणा विकसित करत आहे, ज्यामध्ये कर्मचार्याने नोकरी बदलताच त्याचे जुने पीएफ खाते नवीन कंपनीच्या खात्याशी ऑटो ट्रान्स्फर सुविधेद्वारे आपोआप जोडले जाईल. या स्वयंचलित पद्धतीमुळे तांत्रिक त्रुटी आणि केवायसीच्या समस्यांमुळे अडकणारे दावे कमी होतील आणि पारदर्शकता वाढेल. गेल्या आर्थिक वर्षात ईपीएफओने स्वयंचलित प्रणालीद्वारे 1.87 कोटी दावे यशस्वीरीत्या निकाली काढले आहेत. या ऑटो ट्रान्स्फर सुविधेमुळे कर्मचार्यांना जुन्या कंपन्यांकडे फेर्या मारण्याची किंवा एजंटची मदत घेण्याची गरज भासणार नाही.
खासगी क्षेत्र आणि स्टार्टअपमधील कर्मचारी वारंवार नोकर्या बदलतात, हे लक्षात घेऊन ही पारदर्शक आणि वेगवान व्यवस्था विकसित केली जात आहे. ईपीएफओने आधीच आधार लिंकिंग आणि ऑनलाईन केवायसी यासारख्या सुविधा सुरू केल्या आहेत. आता ऑटो सेटलमेंटच्या अंमलबजावणीमुळे तांत्रिक अडथळे दूर होऊन कोट्यवधी कामगारांना त्यांच्या हक्काचे पैसे विनासायास आणि वेळेवर मिळण्यास मदत होणार आहे.
रमेश कृष्णमूर्ती, केंद्रीय आयुक्त, ईपीएफओ