

नवी दिल्ली : भविष्य निर्वाह निधी (ईपीएफओ) येत्या एप्रिलमध्ये नवीन डिझाईन केलेले मोबाईल अॅप्लिकेशन आणणार आहे. त्यामुळे युनिफाईड पेमेंट इंटरफेस (यूपीआय)द्वारे पीएफ खाते जोडलेल्या बँक खात्यात पैसे वर्ग करता येतील, अशी माहिती पीएफओ कार्यालयातील एका उच्चपदस्थ अधिकार्याने दिली.
कामगार मंत्रालय एका प्रकल्पावर काम करत आहे. यामध्ये ईपीएफचा काही भाग गोठवला जाईल. शिल्लक रकमेतील मोठा हिस्सा यूपीआय वापरून त्यांच्या बँक खात्याद्वारे काढण्यासाठी उपलब्ध असेल. तसेच पासबुकवरील शिल्लक रक्कमदेखील याद्वारे पाहता येईल. सध्या पीएफ सदस्यांना त्यांच्या ईपीएफ खात्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी आणि सेवांचा लाभ घेण्यासाठी युनिव्हर्सल अकाऊंट नंबर (यूएएन) पोर्टल किंवा उमंग अॅप वापरावे लागते. या दोन्ही प्लॅटफॉर्मवर या सेवा उपलब्ध राहतील; तर नवीन अॅप सेवा आणखी वेगवान करेल, असे वृत्त पीटीआयने दिले आहे.
शंभर नमुना खात्यांवर चाचणी
ईपीएफओ सध्या सेवेची कार्यक्षमता सुधारण्यासाठी आणि सेवेतील कोणत्याही तांत्रिक त्रुटी दूर करण्यासाठी 100 नमुना खात्यांवर चाचणी घेतली जात आहे.
असे काम करेल अॅप
पीएफ सदस्य मोबाईल अॅप्लिकेशनमध्ये त्यांच्या लिंक केलेल्या बँक खात्यांमध्ये ईपीएफ शिल्लक पाहू शकतील. त्यांना व्यवहार पूर्ण करण्यासाठी त्यांचा लिंक केलेला यूपीआय पिन वापरण्याची परवानगी दिली जाईल. यामुळे त्यांच्या बँक खात्यांमध्ये निधीचे सुरक्षित हस्तांतरण होईल.