राजकीय फायद्यासाठी हिंदू समाज तोडणाऱ्यांना महाराष्ट्रातील जनता नाकारेल : पंतप्रधान मोदी

नागपूर-शिर्डी विमानतळ पायाभरणी, महाराष्ट्रातील १० वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन
PM Modi attacks Congress
पंतप्रधान नरेंद्र मोदीPudhari File Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा :

राजकीय फायद्यासाठी हिंदू समाज तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना महाराष्ट्रातील जनता नाकारेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्रातील विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करण्यात आले. त्यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे या कार्यक्रमाला संबोधित केले. नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नूतनीकरण आणि शिर्डी विमानतळावरील नव्या एकात्मिक टर्मिनल इमारतीची पायाभरणी, महाराष्ट्रातील १० सरकारी वैद्यकीय महाविद्यालये, भारतीय कौशल्य संस्था (आयआयएस), मुंबई आणि विद्या समीक्षा केंद्र, महाराष्ट्र यांचे उद्घाटन त्यांनी यावेळी केले.

PM Modi attacks Congress
महाराष्ट्र विधानसभा निवडणुका कधी होणार?: निवडणूक आयोगाने दिले संकेत

या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान म्हणाले की महाराष्ट्राला १० नवीन वैद्यकीय महाविद्यालये, नागपूर विमानतळाचे आधुनिकीकरण आणि विस्तार तसेच शिर्डी विमानतळावरील नव्या एकात्मिक टर्मिनल इमारतीची उभारणी या प्रकल्पांसह महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांची भेट दिली जात आहे. महाराष्ट्राच्या जनतेचे विकास प्रकल्पांसाठी अभिनंदन केले. त्यांनी वाढवण बंदर, मराठीला अभिजात भाषा म्हणून दिलेला दर्जा या केंद्र सरकारच्या कामांचा उल्लेख केला. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यामुळे कोट्यवधी मराठी बांधवांचे स्वप्न साकार झाले आहे, असे ते म्हणाले.

हरियाणाचा निकाल देशातील जनतेच्या मनाचा कल

हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालाबद्दल बोलताना ते म्हणाले की, हरियाणाच्या मतदारांनी देशातील जनतेच्या मनाचा कल स्पष्टपणे दाखवून दिला आहे. दोन कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर सलग तिसऱ्यांदा हरियाणात मिळालेला विजय ऐतिहासिक होता असे ते म्हणाले. वैयक्तिक लाभासाठी विभाजनवादी राजकारण करणाऱ्या आणि मतदारांची दिशाभूल करणाऱ्यांपासून सावध राहण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी जनतेला केले. भारतातील मुस्लिमांमध्ये भीती निर्माण करून त्यांना मतपेढीमध्ये रूपांतरित करण्याचा प्रयत्न केला जातो. हिंदू धर्मातील जातिवादावर स्वतःच्या फायद्यासाठी भाष्य केले जाते, असे ते म्हणाले.

१० सरकारी वैद्यकीय महाविद्यालये कुठे?

पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील मुंबई, नाशिक, जालना, अमरावती, गडचिरोली, बुलढाणा, वाशीम, भंडारा, हिंगोली आणि अंबरनाथ (ठाणे) या दहा सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन केले. नवीन वैद्यकीय महाविद्यालयांमुळे महाराष्ट्रात आणखी ९०० वैद्यकीय जागा तयार होतील. राज्यातील एकूण वैद्यकीय जागांची संख्या सुमारे ६ हजार होईल असे पंतप्रधानांनी सांगितले. सरकारने वैद्यकीय शिक्षण सुलभ केले आहे, महाराष्ट्रातील तरुणांसाठी नवीन संधींची दारे खुली झाल्याचे त्यांनी नमूद केले.

शिर्डी विमानतळाच्या मालवाहू विमान सेवेचा शेतकऱ्यांना फायदा होणार

साई बाबांच्या भक्तांना शिर्डी विमानतळ परिसरातील नव्या टर्मिनलचा खूप फायदा होणार असून देश परदेशातून अधिक लोकांना शिर्डीला येणे सुलभ होईल. शिर्डी विमानतळावर बांधले जात असलेले स्वतंत्र कार्गो कॉम्प्लेक्स (मालवाहू विमान सेवा संकुल) शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयोगी ठरणार असून, इथून त्यांना विविध प्रकारची कृषी उत्पादने देशभरात आणि परदेशात निर्यात करता येतील, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. शिर्डी, लासलगाव, अहिल्यानगर आणि नाशिक येथील शेतकऱ्यांना कांदा, द्राक्ष, पेरू आणि डाळिंब यांसारखी उत्पादने मोठ्या बाजारपेठेत सहज पोहोचवता येतील, त्यामुळे कार्गो कॉम्प्लेक्स त्यांच्यासाठी विशेष लाभदायक ठरेल.

PM Modi attacks Congress
One Nation One Election : लोकसभेसोबतच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तयारी

अद्ययावत तंत्रज्ञान प्रशिक्षणासाठी भारतीय कौशल्य संस्था

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय कौशल्य संस्था, मुंबईचे उद्घाटनही केले. उद्योग क्षेत्रासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि अद्ययावत प्रशिक्षण घेतलेले कर्मचारी तयार करणे, हे याचे उद्दिष्ट आहे. सार्वजनिक-खाजगी भागीदारी मॉडेल अंतर्गत, टाटा एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि भारत सरकार यांच्या सहयोगाने या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. पंतप्रधानांनी यावेळी महाराष्ट्राच्या विद्या समीक्षा केंद्राचे उद्घाटन केले.या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी दूरदृश्य प्रणाली द्वारे उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news