नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : स्वतंत्रता सेनानी आणि आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त पराक्रम दिवस साजरा करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला येथे त्यांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. तर भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत त्यांचे योगदान अतुलनीय आहे, अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी नेताजींना अभिवादन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे,संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मंत्री पियुष गोयल, जितेंद्र सिंह यांनी आज संविधान सदन या जुन्या संसद भवनातील मध्यवर्ती कक्षात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या तैलचित्राला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. राज्यसभेचे उपसभापती हरिवंश हे देखील याप्रसंगी उपस्थित होते.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मिडिया एक्सवर पोस्ट करूनही नेताजींना आदरांजली अर्पण केली. ‘भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत नेताजींचे योगदान अतुलनीय आहे. ते धैर्याचे प्रतीक होते. त्यांनी पाहिलेल्या भारताच्या उभारणीसाठी आपण काम करत असताना त्यांचा दृष्टिकोनआपल्याला प्रेरणा देतो,’ असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
संसद परिसरात झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात काही काळ चर्चा झाली. मल्लिकार्जुन खर्गे यांनी काही गोष्टी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितल्या. पंतप्रधान मोदींनी त्या ऐकून घेत मल्लिकार्जुन खर्गेंशी हस्तांदोलन केले. यावेळी इतर मंत्रीही उपस्थित होते.