कुस्‍तीतील 'वाद' घुमू लागला राजकीय आखाड्यात!

फोगाट आणि पुनियाच्‍या काँग्रेस प्रवेशाने आरोप-प्रत्यारोपांना उधाण
Vinesh Phogat  join Congress
कुस्तीपटू विनेश फोगट, बजरंग पुनिया यांनी राहुल गांधी यांची भेट घेतल्‍यानंतर अधिकृतपणे काँग्रेस पक्षात प्रवेश केला. (Image source- Congress)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : कुस्‍तीपटू विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनी काँग्रेसमध्‍ये प्रवेश केल्‍यानंतर मागील दीड वर्षांपासून कुस्‍तीमधील 'वर्चस्‍व' वाद आता राजकीय आखाड्यात घुमू लागल्‍याचे चित्र आहे. रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (WFI) चे माजी अध्‍यक्ष व भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह आणि काँग्रेस नेते पवन खेरा यांच्‍यात जुंपली तर फोगाट, पुनिया यांच्‍या पक्ष प्रवेशावरुन भाजपनेही काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

ब्रिजभूषण यांचा काँग्रेसवर हल्‍लाबोल

१८ जानेवारी २०२३ रोजी दिल्‍लीतील जंतरमंतरवर माझ्‍याविरोधात आंदोलन सुरु झाले. या आंदोलनाच्‍या पहिल्‍याच दिवशी मी हे आंदोलन खेळाडू नाही तर काँग्रेसचे आहे असे म्‍हटलं होते. आता विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनी काँग्रेसमध्‍ये प्रवेशाने हे आता सिद्ध झाले आहे, अशा शब्‍दांमध्‍ये ब्रिजभूषण शरण सिंह यांनी काँग्रेसवर हल्‍लाबोल केला. या आंदोलनामागे भूपेंद्र हुडा, प्रियांका गांधी, राहुल गांधी हेही सिद्ध झाले आहे. या संपूर्ण आंदोलनामागे काँग्रेसचा हात होता. हा आमच्या विरोधात कटाचा एक भाग होते. या संपूर्ण आंदोलनाचे नेतृत्व भूपेंद्र हुड्डा करत होते. मी हरियाणातील लोकांना सांगू इच्छितो की, भूपेंद्र हुड्डा, दीपेंद्र हुड्डा, बजरंग किंवा विनेश हे लोक मुलींच्या सन्मानासाठी कधीच आंदोलन करत नव्‍हते, असेही ते म्‍हणाले.

अन्यायाविराेधात काँग्रेस लढते : पवन खेरा

ब्रिजभूषण शरण सिंह यांना तत्‍काळ काँग्रेसचे नेते पवन खेरा यांनी प्रत्‍युत्तर दिले. ते म्हणाले की, " चुकीचे काम करण्‍यार्‍यांची भाजप नेहमीच पाठराखण करतो. तर ज्याच्यावर अन्याय होतो त्‍यांच्‍यासाठी काँग्रेस पक्ष लढतो. त्‍यांच्‍यासाठी आवाज उठवतो. ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात सहा खेळाडूंनी एफआयआर दाखल केला होता. आम्हाला अभिमान आहे की आम्ही आमच्या मुलींच्या पाठीशी उभे होतो, उभे आहोत आणि यापुढेही उभे राहू."

काँग्रेसने खेळाडूंच्या नावाखाली राजकारण केले: अनिल विज

अंबाला येथील भाजप नेते अनिल विज यांनी म्‍हटलं आहे की, काँग्रेस पक्षाकडून उमेदवारांची एक यादी समोर आली आहे. या यादीत अनेक कलंकित लोकांची नावे आहेत. एक उमेदवार अजूनही तुरुंगात आहे. भूपेंद्रसिंग हुड्डा यांच्याविरुद्ध खटला सुरू असून, त्‍यांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. दुसऱ्या उमेदवारावर ईडीची कारवाई सुरू आहे. हीच काँग्रेस पक्षाची ओळख आहे. काँग्रेस खेळाडूंच्या नावाखाली राजकारण करत आहे, जे लाजीरवाणे आहे.

विनेशच्‍या अपात्रतेचा आनंद साजरा केला, ते देशभक्त आहेत का? : बजरंग पुनिया

विनेश फोगाटने ऑलिम्पिक पदकाची संधी गमावली कारण देवाने तिला शिक्षा केली होती, असे ब्रिजभूषण शरण सिंग यांनी म्‍हटले होते. ज्यांनी विनेशच्या अपात्रतेचा आनंद साजरा केला, ते देशभक्त आहेत का?, असा सवाल करत बजरंग पुनिया याने आपल्‍या भूमिकेचे समर्थन केले. तो म्‍हणाला की, ब्रिजभूषण सिंग याच्‍यावर चोरीपासून देशद्रोहापर्यंतचे आरोप आहेत. भाजप त्याला पाठिंबा देत आहे, असा आरोपही त्‍याने केला. काँग्रेस पक्षाने कठीण काळात कुस्तीपटूंना साथ दिली. त्‍यामुळे मी काँग्रेस पक्षात दाखल होण्‍याचा निर्णय घेतला. मी हरियाणा विधानसभा निवडणुकीत लढत नाही, असेही त्‍याने स्‍पष्‍ट केले आहे.

हे घडणारच होते : संजय सिंग

बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर भारतीय कुस्ती संघटनेचे अध्यक्ष संजय सिंग यांनीही काँग्रेसवर जोरदार टीका केली. ते म्‍हणाले की, "हे घडणारच होते. कुस्‍तीपटूंचे दिल्‍लीतील आंदोलन हे काँग्रेसच्या इशाऱ्यावरच होत होते. या आंदोलनाचे सूत्रधार दीपेंद्र हुड्डा कुटुंब होते. याची संपूर्ण देशाला माहीत आहे."

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news