

Gopal Khemka Murder Case : पाटण्यातील उद्योजक गोपाल खेमका यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी विकास उर्फ राजा हा पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत ठार झाला आहे. विकास उर्फ राजा याने खेमका यांच्या हत्येसाठी वापरलेले शस्त्र पुरवले होते. या प्रकरणातील मुख्य संशयित शूटर उमेश याचा ताे साथीदार हाेता.
खेमका हत्या प्रकरणाच्या पोलीस तपासात विकास उर्फ राजा याचे नाव समोर आले. त्यानेच मुख्य आरोपी उमेश याला शस्त्र पुरवल्याची माहिती मिळाली. याला पकडण्यासाठी शहरातील माल सलामी परिसरात पोलीस गेले. यावेळी विकासने पोलिसांवर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तो ठार झाला. घटनास्थळावरून पोलिसांनी एक पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि वापरलेल्या गोळ्यांच्या पुंगळ्या जप्त केल्या आहेत.
पाटणा येथील प्रसिद्ध उद्योगपती गोपाल खेमका यांची ४ जुलै रोजी रात्री गांधी मैदान परिसरातील त्यांच्या निवासस्थानाबाहेर गाडीतून उतरताच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. खेमका यांच्या हत्येनंतर बिहारमधील कायदा व सुव्यवस्थेवर विरोधी पक्षांनी सवाल उपस्थित केले होते. पाटणा पोलिसांनी १२हून अनेकांना अटक केली आहे. पाटण्यातील पुनपुन येथील रहिवासी असलेल्या रोशन कुमार नावाच्या एका संशयिताला ६ जुलै रोजी खेमका यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी झाल्याचे दिसल्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पोलिसांच्या मते, खेमका यांची हत्या अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आली होती. यासाठी अनेक सूत्रधारांनी मिळून कट रचला होता. ४ जुलैच्या रात्री खेमका यांच्या हालचालींवर पाळत ठेवण्यासाठी 'स्पॉटर्स'ची मदत घेण्यात आली होती.
बिहार भाजपचे नेते नीरज कुमार यांनी आरोप केला आहे की, ही हत्या करण्यासाठी शूटरला एका राजकीय व्यक्तीने सुपारी दिली होती. त्यांनी 'X' (पूर्वीचे ट्विटर) वर गोपाल खेमका यांचे छायाचित्र शेअर करत लिहिले, "प्रसिद्ध उद्योजक गोपाल खेमका यांच्या हत्येतील शूटरला पोलिसांनी अटक केली आहे. उमेश नावाच्या या शूटरला एका 'राजकीय व्यक्ती'ने हत्येची सुपारी दिली होती. समजलं का? बिहारला धोका कोणापासून आहे, हे ओळखा?"