Aircraft manufacturing : प्रवासी विमानांची निर्मिती होणार भारतातच!

‘एचएएल’चा रशियन कंपनीशी ऐतिहासिक करार; ट्रम्प यांना धक्का
Aircraft manufacturing
प्रवासी विमानांची निर्मिती होणार भारतातच!
Published on
Updated on

नवी दिल्ली : देशाच्या नागरी विमान वाहतूक क्षेत्रात आत्मनिर्भरतेच्या द़ृष्टीने भारताने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. भारताच्या हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) रशियाच्या युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन (यूएसी) या कंपनीशी एक सामंजस्य करार केला असून, याअंतर्गत एसजे-100 या प्रवासी विमानांची निर्मिती आता भारतात केली जाणार आहे. अमेरिकेनी केलेली आयात शुल्कवाढ तसेच रशियाकडून तेलखरेदी थांबविण्यासाठीच्या दबावाला न जुमानता पार पडलेला हा करार डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी एक धक्का मानला जात आहे.

या ऐतिहासिक कराराअंतर्गत एचएएलला भारतात एसजे-100 विमानांची निर्मिती करण्याचा अधिकार प्राप्त होणार असून, एखाद्या प्रवासी विमानाची पूर्णपणे निर्मिती देशातच होण्याची ही पहिलीच वेळ असेल. याआधी एचएएलने 1961 ते 1988 दरम्यान एव्हीआरओ एचएस-748 विमानाची निर्मिती केली होती. देशाच्या उडान योजनेअंतर्गत कमी अंतराच्या उड्डाणांच्यादृष्टीने मोठा बदल घडवून आणण्याची क्षमता एसजे-100 विमानांत आहे. या प्रकल्पामुळे खासगी विमान वाहतुकीला बळकटी मिळेल, याबरोबरच प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या रोजगाराच्या हजारो संधी निर्माण होणार आहेत.

आत्मनिर्भरतेचा नवा अध्याय

आगामी दहा वर्षांत भारतातील क्षेत्रीय कनेक्टिव्हिटीच्यादृष्टीने 200, तर महासागरी क्षेत्र आणि आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळांसाठी 350 अतिरिक्त जेट विमानांची गरज भासेल, असा अंदाज आहे. एसजे-100 विमानांच्या निर्मितीमुळे या गरजेची केवळ पूर्तता होणार नसून भारताच्या नागरी विमान वाहतूक क्षेत्रात आत्मनिर्भरतेच्या दृष्टीने नवा अध्यायही जोडला जाणार आहे.

असे असते एसजे-100 विमान

हे एक ट्विन इंजिन आणि नॅरो बॉडी असलेले प्रवासी विमान असून आतापर्यंत अशी 200 हून अधिक विमाने तयार करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे ती 16 हून अधिक आंतरराष्ट्रीय एअरलाईनकडून ऑपरेट केली जातात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news