

नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन शुक्रवारी संपले. दोन्ही सभागृहांचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले आहे. शुक्रवारी, सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी विरोधी पक्षाच्या खासदारांनी विजय चौक ते संसदेपर्यंत मोर्चा काढला. या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीही विरोधकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दलच्या वक्तव्याबद्दल अमित शाह यांचा राजीनामा मागितला. त्याचवेळी, सत्ताधारी पक्षही सोरोसबाबत काँग्रेसवर हल्लाबोल करत राहिला. दोन्ही बाजूंच्या गदारोळामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज शेवटच्या दिवशीही ठप्प झाले.
२५ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनात अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. या अधिवेशनात राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव, संविधानावर चर्चा झाली. अधिवेशनात सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये सतत मतभेद दिसून आले. अदानीवरील कथित लाचखोरीच्या आरोपांवर चर्चेच्या मागणीवर विरोधी पक्ष ठाम राहिला. तर भाजप खासदारांनी "सोरोस-गांधी संबंध" च्या दाव्यावर जोरदार प्रत्युत्तर दिले. अपुरी माहिती आणि कागदपत्रातील त्रुटींमुळे धनखड यांच्याविरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळण्यात आला. तर ऐतिहासिक घटना दुरुस्ती अंतर्गत 'एक राष्ट्र एक निवडणूक' विधेयक लोकसभेत मांडण्यात आले. हे विधेयक सखोल चर्चेसाठी संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) कडे पाठवण्यात आले आहे.
संविधानवरील चर्चेदरम्यान अमित शाह यांनी राज्यसभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात विरोधकांची एकजूट दिसून आली. हिवाळी अधिवेशनात विरोधकांमध्ये एकमेकांबद्दल दिसणारी नाराजी या मुद्द्यावरून दूर झाली. विरोधकांसाठी हा मुद्दा एकजुटीची संजीवनी ठरला. त्याचवेळी राज्यघटनेवरील चर्चेत घेतलेली आघाडी सत्ताधाऱ्यांनी गमावली. तसेच संसदेच्या संकुलात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये थेट धक्काबुक्की सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे दोन खासदारांना रुग्णालयात दाखल करावे लागले. राहुल गांधींनी दोन खासदारांना धक्काबुक्की केल्याचा आरोप भाजपने केला. तर राहुल गांधींनी आरोप फेटाळले. अदानी प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी भाजप हे करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
गुरुवारी संसदेच्या मकरद्वारावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये निदर्शनादरम्यान गोंधळ झाला. या संदर्भात भाजपने राहुल गांधींवर धक्काबुक्की केल्याचा आरोप करत त्यांच्यावर एफआयआर दाखल केला. संसदेच्या संकुलात या एफआयआरला उत्तर देताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, हे सरकारच्या निराशेचे प्रतीक आहे. ही खोटी तक्रार आहे. राहुल गांधी कोणालाही धक्का देऊ शकत नाहीत, मी त्यांची बहीण आहे, हे मला माहीत आहे. खरे सांगायचे तर देशालाही हे माहीत आहे. अदानींवर चर्चा नको म्हणून ते किती हतबल झाले आहेत हे देशाला दिसत आहे. आंबेडकरांचा अपमान देश खपवून घेणार नाही, असे प्रियंका गांधी म्हणाल्या.
संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी संसदेच्या संकुलात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, काँग्रेस आता लढण्याकडे झुकली आहे. आमचे खासदार कसे दुखावले गेले ते सर्वांनी पाहिले. प्रियंका गांधींनी ते पाहिले नसेल. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी धक्काबुक्की केली. गांधींनी देशाची माफी मागावी ही एनडीएच्या खासदारांची मागणी असल्याचे ते म्हणाले.