

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा: संसदेचे अधिवेशन १२ ऑगस्टपर्यंत चालणार होते. मात्र त्यापुर्वीच लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांचे कामकाज गुंडाळण्यात आले. दोन्ही सभागृह अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले. दरम्यान, या अधिवेशनात चांगलाच गदारोळ झाला. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. राज्यसभेत सभापती जगदीप धनखड आणि विरोधकांमधील वाद इतका वाढला की सभापती संतापले आणि त्यांनी खुर्चीही सोडली. नंतर त्यांनी पुन्हा विरोधकांना खडसावले. लोकसभेतही सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात बरीच टीकाटिप्पणी झाली. यात काही वेळा विरोधकांनी सभात्याग केला. (Parliament Session)
वक्फ बोर्ड विधेयकावरून लोकसभेत गदारोळ सुरू असतानाच राज्यसभेत जया बच्चन प्रकरणावरून गदारोळ झाला. दरम्यान, गदारोळामुळे राज्यसभेचे २६५ वे अधिवेशन शुक्रवारी अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले. त्याचवेळी लोकसभेचे कामकाजही अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले. (Parliament Session)
या अधिवेशनात अर्थसंकल्पाव्यतिरिक्त विनियोग विधेयक आणि वित्त विधेयकावर चर्चा झाली. यासोबतच तीन मंत्रालयांच्या कामकाजावरही चर्चा झाली. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी शेजारील बांगलादेशातील परिस्थितीबाबत सभागृहात निवेदन दिले. (Parliament Session)
अठराव्या लोकसभेच्या दुसऱ्या अधिवशेनाच्या शेवटी लोकसभा अध्यक्षांनी कामकाजाचा तपशील सादर केला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की, अधिवेशनात १५ बैठका झाल्या, या बैठका ११५ तास चालल्या. तसेच या अधिवेशनात १२ शासकीय विधेयके मांडण्यात आली आणि एकूण ४ विधेयके मंजूर करण्यात आली. वित्त विधेयक, विनियोग विधेयक, जम्मू आणि काश्मीर विनियोग विधेयक आणि भारतीय विमान विधेयक यापैकी प्रमुख आहेत. लोकसभेच्या या अधिवेशनाची कामकाजाची उत्पादकता अंदाजे १३६ टक्के होती. या अधिवेशनात ६५ खासगी विधेयके मांडण्यात आली.
लोकसभेने भारतीय विमान विधेयक २०२४ मंजूर केले. या विधेयकात विमानाची रचना, निर्मिती, देखभाल, ताबा, वापर, ऑपरेशन, विक्री, निर्यात आणि आयात आणि त्यांच्याशी संबंधित बाबींचे नियमन आणि नियंत्रण करण्याची तरतूद आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात हे विधेयक राज्यसभेत जाईल. राज्यसभेची मंजुरी मिळाल्यानंतर हे विधेयक कायदेशीर अंमलबजावणीत आणले जाईल.