

नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा तिसरा आठवडाही गदारोळाने सुरू झाला. लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात सोमवारी पुन्हा गदारोळ झाला. दोन्ही सभागृहात सोरोस विरुद्ध अदानी यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी सुरू आहे. सत्ताधारी पक्ष सोरोस प्रकरणावरुन विरोधकांना कोंडीत पकडत आहे. त्याचवेळी विरोधक अदानी प्रकरणावरुन सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल करत आहेत. त्यामुळे सोमवारीही दोन्ही सभागृहात कामकाज होऊ शकले नाही.
लोकसभेचे कामकाज विस्कळीत होत असल्याचे पाहून राज्यसभेनेही गदारोळानंतर सभागृहाचे कामकाज तहकूब करण्याचे धोरण स्वीकारले आहे. राज्यसभेचे कामकाज चालवण्यासंदर्भात झालेल्या बैठकीत लोकसभेतील गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज चालवले जात नसल्याचे सांगण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. लोकसभेचे कामकाज सुरळीत सुरु झाल्यावरच राज्यसभेचे कामकाजही सुरळीत सुरू होईल, अशी शक्यता आहे.
१३ आणि १४ डिसेंबर रोजी लोकसभेत होणाऱ्या संविधानावरील चर्चेविषयी साशंकता निर्माण झाली आहे. संविधानावरील चर्चेदरम्यान, आणीबाणीची आठवण करून देत काँग्रेसवर हल्लाबोल करण्याचा डाव सत्ताधाऱ्यांनी आखल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, अदानी प्रकरणाबाबत विरोधक शांत होण्याची चिन्हे दिसत नाहीत. तर विरोधकांनीही संविधानावरील चर्चेच्या दिवशी ‘मोदी-अदानी एक है तो सेफ है’ असे वाक्य छापलेले जॅकेट घालून घालून येण्याची तयारी केली आहे. हे पाहता लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला सभागृह चालवण्याची परवानगी देण्याची शक्यता नाही. त्यामुळे सभागृहात संविधानावरील चर्चेवर संशयाचे ढग दाटू लागले आहेत. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष या दोघांनाही सभागृह चालवण्यात रस नसल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे. अशा स्थितीत २० डिसेंबरपर्यंत सभागृहाचे कामकाज विस्कळीत होण्याची शक्यता बळावली आहे.