सोरोस आणि अदानी प्रकरणावरून संसदेचे कामकाज विस्कळीत
नवी दिल्ली : संसदेच्या दोन्ही सभागृहात मंगळवारीही कामकाज होऊ शकले नाही. सोरोस आणि अदाणी प्रकरणाबाबत सत्ताधारी पक्षाने विरोधकांनी एकमेकांवर आरोप करत गदारोळ केला. विरोधी आघाडीच्या (इंडिया) अनेक घटक पक्षांच्या खासदारांनी मंगळवारी अदानी समूहाशी संबंधित विषयावर काळ्या रंगाच्या पिशव्या घेऊन निषेध केला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज विस्कळीत झाले.
या गदारोळातच केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी 'व्यापारी शिपिंग विधेयक २०२४' सादर केले. सभागृहाने याला संमती देत स्वीकारले. या विधेयकाला काँग्रेस खासदार मनीष तिवारी आणि तृणमूलच्या खासदार सौगता बॅनर्जी यांनी विरोध केला होता. मात्र पीठासीन अधिकारी दिलीप सैकिया यांनी दोन्ही खासदारांचा विरोध धुडकावून लावत विधेयक विचारार्थ मंजूर केले.
लोकसभेत गदारोळ सुरू असताना संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काँग्रेसला चांगलेच फैलावर घेतले. रिजिजू म्हणाले की, तुमच्या लज्जास्पद वागणुकीमुळे सभागृहाची प्रतिष्ठेला धक्का पोहोचला, त्यासाठी तुम्ही माफी मागितली पाहिजे. अमेरिकन उद्योगपती जॉर्ज सोरोस आणि देशविरोधी शक्तींशी काँग्रेसचे संबंध माहित असले पाहिजेत आणि त्यासाठी विरोधी पक्षाने सभागृहात माफी मागितली पाहिजे, असेही रिजिजू म्हणाले.
दरम्यान, राज्यसभेतील सभागृह नेते जे. पी. नड्डा यांनी काँग्रेसवर हल्ला चढवला. ते म्हणाले की, काँग्रेस पक्ष स्वतंत्र काश्मीरची मागणी करणाऱ्या संघटनेशी संबंधित आहे. काँग्रेससारख्या पक्षामुळे देश सुरक्षित नाही. त्यांनी आरोप केला की काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, फोरम ऑफ डेमोक्रॅटिक लीडर्स इन एशिया-पॅसिफिकच्या सह-अध्यक्ष या नात्याने "जॉर्ज सोरोस फाउंडेशन" द्वारे अर्थसहाय्यित संस्थेशी संबंधित आहेत. राजीव गांधी फाउंडेशनच्या अध्यक्षा या नात्याने सोनिया गांधी यांची "जॉर्ज सोरोस फाऊंडेशनसोबतची भागीदारी भारतीय संस्थांवर विदेशी निधीचा प्रभाव अधोरेखित करते." यानंतर राज्यसभेत गदारोळ झाल्यानंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

