

नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून (बुधवार) सुरुवात होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने अधिवेशनाला सुरुवात होईल. राष्ट्रपती लोकसभा आणि राज्यसभेला संयुक्तपणे संबोधित करतील. या अभिभाषणातून केंद्र सरकारच्या आजवरच्या कार्यकाळाचा आढावा तसेच आगामी काळातील धोरणात्मक दिशा स्पष्ट केली जाण्याची शक्यता आहे.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर दोन्ही सभागृहांमध्ये त्यावरील धन्यवाद प्रस्ताव मांडण्यात येईल. पुढील काही दिवस या प्रस्तावावर सत्ताधारी व विरोधी पक्षांकडून सविस्तर चर्चा होणार आहे.
गुरुवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आर्थिक सर्वेक्षण सादर करतील. या आर्थिक सर्वेक्षणातून देशाची आर्थिक स्थिती, विकासदर, रोजगार, महागाई आणि विविध क्षेत्रातील कामगिरीचे चित्र समोर येणार आहे. त्यानंतर १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री देशाचा महत्त्वपूर्ण अर्थसंकल्प सादर करतील.
दरम्यान, अधिवेशनाचे कामकाज सुरळीत पार पडावे, यासाठी मंगळवारी केंद्र सरकारकडून सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू उपस्थित होते. विरोधी पक्षांकडून काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सरकारसमोर विविध मुद्दे मांडले.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणात केंद्र सरकारने राबवलेल्या योजना, पायाभूत सुविधा, सामाजिक आणि आर्थिक सुधारणा यांचा उल्लेख केला जाण्याची शक्यता आहे. तसेच पुढील काळात विकास, रोजगारनिर्मिती आणि आर्थिक स्थैर्य यावर सरकारचा भर कसा असेल, याचे संकेतही दिले जाऊ शकतात.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग नवव्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यानिमित्त सलग नऊ वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम त्यांच्या नावे होणार आहे.
२८ जानेवारीपासून सुरू होत असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा १३ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. या काळात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर चर्चा होऊन तो मंजूर केला जाईल. तसेच केंद्रीय अर्थसंकल्पावरही सविस्तर चर्चा केली जाईल. त्यानंतर काही दिवसांची विश्रांती असेल. अधिवेशनाचा दुसरा टप्पा ९ मार्चपासून सुरू होऊन २ एप्रिलपर्यंत चालेल.