

नवी दिल्ली : हरियाणातील पानीपत युद्धाला १४ जानेवारी २०२५ ला २६४ वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने शौर्य स्मारक समितीतर्फे पानीपत युद्धात आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या योद्ध्यांना आदरांजली अर्पण केली जाणार आहे. विविध कार्यक्रम या निमित्ताने पानीपतमध्ये होणार आहेत. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रामुख्याने उपस्थित असणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे उपस्थित राहणार आहेत.
शौर्य स्मारक समितीचे प्रमुख प्रदीप पाटील यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत या कार्यक्रमाची माहिती दिली. ते म्हणाले की, १४ जानेवारीला पानिपतचे युद्ध झाले होते. मराठे आणि अहमदशाह अब्दाली यांच्यात हे युद्ध झाले होते. अनेक लोकांनी या युद्धात आपल्या प्राणाची आहुती दिली होती. या युद्धाला १४ जानेवारीला २६४ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हरियाणासह महाराष्ट्र आणि देशातील इतरही राज्यातून लोक या कार्यक्रमाला येणार आहेत.