

कच्छ; वृत्तसंस्था : भारत-पाकिस्तान सीमेवर असलेल्या गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पाकिस्तानमधून आलेले एक अल्पवयीन प्रेमीयुगुल भारतीय सीमा ओलांडून 40 किलोमीटर आत रतनपार या गावाजवळ आलेे. बुधवारी संध्याकाळी गावकर्यांना संशय आल्याने त्यांनी दोघांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
पोलिसांच्या माहितीनुसार, 16 वर्षीय मुलगा आणि 15 वर्षांची मुलगी हे दोघेही पाकिस्तानातील इस्लामकोट येथील लासरी गावचे रहिवासी आहेत. दोघांमध्ये प्रेमसंबंध होते; मात्र घरच्यांनी त्यांच्या नात्याला मान्यता नाकारल्याने त्यांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला.
ते रात्री 12 वाजता घरून निघाले, थोडे अन्न आणि पाणी सोबत घेऊन त्यांनी सुमारे 60 किलोमीटरचे वाळवंट पार केले आणि कच्छ जिल्ह्यातील रतनपार गावाजवळील संगवारी मंदिरापर्यंत ते पोहोचले. संशयास्पद वाटल्याने ग्रामस्थांनी पोलिसांना बोलावले.
खादिर पोलिस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल अजयसिंह झाला यांनी सांगितले की, दोघे मीर समुदायातील आहेत. दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून, सुरक्षा यंत्रणांकडून कसून चौकशी सुरू आहे. सध्या पकडण्यात आलेल्या दोन्ही अल्पवयीनांवर कायदेशीर प्रक्रिया सुरू असून, भारताच्या सुरक्षा यंत्रणांकडून त्यांची पार्श्वभूमी आणि हेतू तपासला जात आहे. त्यांच्याकडे कोणतीही ओळखीची कागदपत्रे मिळालेली नाहीत.
कच्छ सीमेवर यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. मार्च 2025 मध्ये, एका 18 वर्षीय पाकिस्तानी तरुणाला खावडा परिसरात पकडले होते. तो घरगुती वादातून रागाच्या भरात भारतात आला होता. सप्टेंबर 2024 मध्ये, जम्मू-काश्मीरमधील युवकाला पाकिस्तानातील प्रेयसीला भेटण्यासाठी जाताना बीएसएफने अटक केली होती. जुलै 2020 मध्ये, महाराष्ट्रातील एका तरुणाने सोशल मीडियावरून ओळख झालेल्या पाकिस्तानी युवतीला भेटण्यासाठी भारत-पाकिस्तान सीमा पार करण्याचा प्रयत्न केला होता.