

झालावाड : राजस्थानमधील एका घाऊक किराणा व्यापार्याला पोलिसांनी अटक केली. बिस्किटांच्या पाकिटासोबत पाकिस्तानी झेंडा असलेले फुगे विकल्याचा आरोप या व्यापार्यावर आहे. पोलिसांच्या दाव्यानुसार, लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी हे फुगे मोफत दिले जात होते. या फुग्यांवर उर्दूमध्ये ‘जश्न-ए-आझादी’ असे लिहिलेले असल्याने लोकांमध्ये संतापाची लाट उसळली.
राजस्थान पोलिसांनी बुधवारी सकाळी दिलीप कामरिया नावाच्या या घाऊक व्यापार्याला ताब्यात घेतले. दिलीप आसपासच्या लहान दुकानदारांना माल पुरवण्याचे काम करतो. पोलिसांनी सांगितले की, हे प्रकरण झालावाड येथील आहे आणि झालावाड पोलिसच याचा तपास करत आहेत. झालावाड जिल्ह्यातील नागेश्वर भागातील उन्हेल येथे एका मुलीने दुकानातून बिस्किटाचे पाकीट विकत घेतले. घरी येऊन पाकीट उघडल्यावर तिला त्यात एक फुगा चिकटवलेला आढळला. मुलीने तो फुगा फुगवल्यावर त्यावर पाकिस्तानचा हिरवा-पांढरा झेंडा आणि उर्दूमध्ये ‘जश्न-ए-आझादी’ असे लिहिलेले दिसले.