

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतासाठी मोस्ट वॉन्टेड असणारा लष्कर-ए-तय्यबाचा दहशतवादी अबू कताल याचा पाकिस्तानमध्ये खात्मा झाला आहे. त्याला पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील झेलम येथे शनिवारी रात्री (दि. 15) अज्ञात बंदूकधार्यांनी गोळ्या घालून ठार मारल्याचे वृत्त समोर आले आहे.
अबू कताल हा 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदचा अतिशय निकटवर्तीय होता. दोघे एकमेकांचे नातेवाईक होते. हाफिज सईदने कताल याची लष्कर-ए-तय्यबाचा चीफ ऑपरेशनल कमांडर नियुक्ती करण्यात आली होती. हाफिजने जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या हल्ल्यांची जबाबदारी कतालला दिली होती. तो थेट रावळपिंडी येथे असलेल्या साजिद जट्टला रिपोर्ट करायचा. भारताच्या राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) 2023 च्या राजौरी हल्ल्यात सहभागी असल्याबद्दल अबू कतालचे नावही त्यांच्या आरोपपत्रात नोंदवले होते.
कतालने काश्मीरमध्ये अनेक मोठे हल्ले घडवून आणले. 9 जून 2017 रोजी झालेल्या रियासी बमस्फोटाचा मास्टरमाइंड कतालच होता. तसेच 1 जानेवारी 2023 रोजी राजौरीतील धांगरी गावात नागरिकांना लक्ष्य करून दहशतवादी हल्ला केला होता. हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी आयईडी स्फोट घडवून आणला होता. या हल्ल्यात दोन मुलांसह सात जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण गंभीर जखमी झाले होते. राजौरी हल्ला प्रकरणात एनआयएने बंदी घातलेल्या लष्कर-ए-तोयबा संघटनेच्या पाकिस्तानस्थित तीन हँडलर्ससह पाच आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते.