

नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान भारताने केलेल्या आक्रमक हल्ल्यांमुळे धास्तावलेल्या पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर (एलओसी) आपली ड्रोनविरोधी सुरक्षा यंत्रणा अधिक मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. भारताकडून ‘ऑपरेशन सिंदूर 2.0’ होऊ शकते, या भीतीपोटी पाकिस्तानने रावळकोट, कोटली आणि भिंबर सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणावर काऊंटर-अनमँड एरियल सिस्टम तैनात केल्याची माहिती गुप्तचर सूत्रांनी दिली आहे.
भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या सराव मोहिमांमुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण आहे. स्वतःची सुरक्षा यंत्रणा अधिक भक्कम करण्यासाठी पाकिस्तान आता तुर्की आणि चीनकडून नवीन ड्रोन आणि एअर डिफेन्स सिस्टम खरेदी करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. पाकिस्तानने इलेक्ट्रॉनिक आणि कायनेटिक अशा दोन्ही प्रकारच्या यंत्रणांचा वापर केला आहे. स्पायडर सिस्टम ही यंत्रणा 10 कि.मी. अंतरापर्यंतचे छोटे ड्रोन आणि फिरणारे स्फोटक गोळे शोधण्यास सक्षम आहे. साफरा जॅमिंग गन ही खांद्यावरून डागता येणारी बंदूक आहे, जी 1.5 कि.मी. अंतरावरील ड्रोनचे जीपीएस आणि व्हिडीओ लिंक निकामी करू शकते.
पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर 30 हून अधिक समर्पित अँटी-ड्रोन युनिटस् तैनात केले आहेत. हे तैनात लष्कराच्या 12 व्या आणि 23 व्या इन्फंट्री डिव्हिजनच्या मार्गदर्शनाखाली केले जात आहे. प्रामुख्याने पूंछ, राजौरी, नौशेरा आणि सुंदरबनी या भारतीय क्षेत्रांच्या समोर असलेल्या पाकव्याप्त काश्मीरमधील भागात ही यंत्रणा बसवण्यात आली आहे.