पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानच्या तुरुंगात असणारे भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्याबाबत पाकिस्तानने पुन्हा एकदा रडीचा डाव खेळला आहे. त्यांना अपील करण्याचा अधिकार नाकारला आहे. ते भारतीय गुप्तहेर असल्याचा पाकिस्तानचा आरोप आहे. कुलभूषण जाधव यांना आंतरराष्ट्रीय न्यायालय (आयसीजे) ने केवळ कॉन्सुलर अॅक्सेस देण्याचा आदेश दिला होता. त्या निर्णयामध्ये त्यांना अपील करण्याच्या अधिकाराचा उल्लेख नव्हता, असे पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.
माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेनंतर ९ मे २०२३ रोजी पाकिस्तानमध्ये हिंसाचार उसळला होता. यावेळी झालेल्या निदर्शनांमध्ये सहभागी असल्याचा आरोपींच्या खटल्याची सुनावणी सर्वोच्च न्यायालय करत होते. भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना अपील करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. यावर उत्तर देताना संरक्षण मंत्रालयाचे वकील ख्वाजा अहमद यांनी लष्करी न्यायालयाने हिंसाचारासाठी दोषी ठरवलेल्यांना अपील करण्याचा अधिकार देण्यात आलेला नाही, असे न्यायालयास सांगितले. तसेच त्यांना केवळ आयसीजेच्या आदेशानंतर कॉन्सुलर ॲक्सेस देण्यात आला असल्याचेही त्यांनी नमूद केले, असे वृत्त पाकिस्तानमधील दैनिक 'डॉन'ने दिले आहे.
कॉन्सुलर ऍक्सेस म्हणजे, एखाद्या परदेशी देशात अटक झालेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या नागरिकाला त्यांच्या देशाच्या दूतावासाच्या अधिकाऱ्यांशी (कॉन्सुलर अधिकारी) संपर्क साधण्याचा अधिकार. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने तो कुलभूषण जाधव यांना दिला आहे. त्याचबरोबर मृत्युदंडाच्या शिक्षेचा पुनर्विचार करण्याचेही आवाहन केले होते. याचबरोबर आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानला कुलभूषण जाधव यांच्या त्यांच्या शिक्षेचा आणि मृत्युदंडाच्या शिक्षेचा पुनर्विचार करण्याचे आवाहन केले होते.