

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
भारताने दिलेल्या जबरदस्त तडाख्यानंतर पाकिस्तानात प्रचंड घबराट उडाली असून, पाकिस्तानात बेबंदशाही निर्माण झाली आहे. लष्करप्रमुख असीम मुनीर यांना ताब्यात घेण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यांच्या जागी शमशाद मिर्झा यांची लष्कराच्या प्रमुखपदी नियुक्ती होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पाकिस्तानने लेहपासून सरक्रीकपर्यंत 36 ठिकाणी केलेले 400 वर ड्रोन हल्ले भारताच्या ‘एअर डिफेन्स सिस्टीम’ने हाणून पाडले. पाकचे एक एफ-16 विमानही टिपण्यात आले.
अटारी बॉर्डर, जैसलमेर येथील सीमा सुरक्षा दलाच्या छावणीवरील ड्रोन हल्ले फसले, तर भारताने पाकला चोख उत्तर देत पाकिस्तानच्या चार हवाई सुरक्षा तळांवर ड्रोनचा वज्राघात केला. त्यात पाकचा ‘एअर डिफेन्स रडार’ उद्ध्वस्त झाला. पाकिस्तानकडून तुर्कियेच्या ड्रोनचा वापर होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, पंजाबच्या फिरोजपूरमध्ये बीएसएफच्या तळावर, तसेच जम्मू, नौशेरा, सांबा, पोखरणमध्ये पाकिस्तानने केलेले ड्रोन हल्ले सुरक्षा दलाने परतवून लावले.
पाकिस्तान लष्करप्रमुख असीम मुनीर यांना ताब्यात घेतल्याचे वृत्त असून, पाकिस्तानी सैन्यात यादवी माजल्याची माहिती मिळत आहे. जनरल शाहिद शहर शमशाद मिर्झा हे मुनीर यांच्या जागी लष्करप्रमुख म्हणून नियुक्त केले जाण्याची शक्यताही आहे.
भारताच्या जबरदस्त वज्राघाताने पाकिस्तान लष्करात दुफळीच्या उलटसुलट बातम्या येत असतानाच विविध शहरांत माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे समर्थक रस्त्यावर उतरले असून, त्यांनी पाक सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत इम्रान खान यांना मुक्त करून त्यांच्या हाती देशाचा कारभार देण्याची मागणी लावून धरली आहे.
पाकमध्ये अंतर्गत कलहाला सुरुवात झाली आहे. बलुच लिबरेशन आर्मीनेही पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याविरोधात आघाडी उघडली आहे. बलुच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानी सैनिकांना जोरदार तडाखे द्यायला सुरुवात केली असून, अनेक सैन्यतळ ताब्यात घेतल्याची घोषणा केली आहे.
माजी पंतप्रधान नवाज शरीफ उपचारांसाठी लंडनला गेले होते; पण उपचार अर्धवट सोडून त्यांनी पाकिस्तान गाठले आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढलेला असताना, गुरुवारी रात्री झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत ते सहभागी झाले. या बैठकीला सर्वच मंत्री आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. तणाव कमी करण्यासाठी शरीफ यांनी आता पडद्याआडून सूत्रे हलवायला सुरुवात केली आहे. भारतासोबतचे संबंध सुधारण्यासाठी ते प्रयत्नशील असल्याचेही सूत्रांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या कार्यकाळात भारत आणि पाकिस्तानचे संबंध सुधारण्याच्या दिशेने वाटचाल सुरू होती. 2016 मध्ये उरी येथे दहशतवादी हल्ला झाला. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तानात ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला. त्यामुळे संबंध पुन्हा बिघडले.
उगाच आक्रमक होऊ नका, असा सल्ला नवाज शरीफ यांनी बंधू आणि पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना दिला. त्यानंतर मात्र शाहबाज यांचा सूर बदलला आहे. शाहबाज सरकारने सगळ्या राजनैतिक मार्गांचा वापर करून तणाव निवळण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी नवाज यांची इच्छा आहे.
पाकिस्तानने 8-9 मे रोजीच्या मध्यरात्री भारताच्या सैन्य स्थळांना लक्ष्य केले. आंतरराष्ट्रीय सीमेवर लेहपासून सरक्रीकपर्यंत पाकने 36 भारतीय ठिकाणांवर 300 ते 400 ड्रोन हल्ले केले. पाकचे हे ड्रोन हल्ले भारतीय हवाई सुरक्षा प्रणालीने हाणून पाडले. त्यानंतर भारतीय सैन्याने कडक प्रत्युत्तर देत पाकिस्तानच्या 4 हवाई सुरक्षा स्थळांवर जबरदस्त ड्रोनचा प्रहार केला. यामध्ये पाकचा एडी रडार उद्ध्वस्त झाला आहे, अशी माहिती कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनीही पाकच्या नापाक हालचालींची माहिती यावेळी दिली.
पाकने पश्चिमी सीमेवरील भारतीय हवाई क्षेत्राचे उल्लंघन केले. पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेवर गोळीबार केला. पाकिस्तानी ड्रोन हल्ल्याचा उद्देश भारतीय हवाई सुरक्षा प्रणालीची माहिती घेणे आणि हेरगिरी करणे हा होता. पाकच्या ड्रोन मलब्याची फॉरेन्सिक चाचणी सुरू आहे. प्राथमिक अहवालानुसार, पाकिस्तान तुर्किचे ‘असीस गार्ड सौंगड’ ड्रोन वापरत असल्याचे समजले आहे, असे कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह म्हणाल्या.
पाकने भटिंडा सैन्य छावणीवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. पाकच्या हल्ल्याला निष्क्रिय करण्यात आले. जम्मू-काश्मीरमधील तंगधार, उरी, पूंछ, राजौरी, अकनूर आणि उधमपूरमध्ये ड्रोन हल्ले, गोळीबार करून नियंत्रण रेषेपार पाकने हल्ले केले. यामध्ये भारतीय सैन्याचे काही जवान शहीद झाले, तर काही जखमी झाले. याला प्रत्युत्तर म्हणून भारताने हल्ला केला. यामध्ये पाकिस्तानी सैन्याचेही मोठे नुकसान झाले, असे कर्नल कुरेशी म्हणाल्या.
भारत-पाकिस्तान यामधील तणाव वाढत आहे. तरीही पाकने नागरी हवाई क्षेत्र बंद केले नाही; तर पाकिस्तान नागरी विमानांना ढालेप्रमाणे वापरत आहे, असे कर्नल कुरेशी आणि विंग कमांडर सिंह यांनी सांगितले. भारत आणि पाकिस्तान सीमेजवळील आंतरराष्ट्रीय विमानांसह नागरी विमानांसाठी सुरक्षित नाही. यावेळी कर्नल सोफिया कुरेशी यांनी पाक आणि भारत सीमेजवळील हवाई वाहतुकीचे फोटो दाखवलेे. ‘फ्लाईट रडार 24’नुसार, भारताच्या हवाई क्षेत्रात नागरी वाहतूक दिसत नाही. मात्र, कराची आणि लाहोरजवळ नागरी विमाने उडताना दिसत आहेत, असे त्या म्हणाल्या. भारतीय वायुसैन्याने आपल्या प्रत्युत्तरात संयम दाखवला आणि नागरिकांची सुरक्षितता निश्चित केली, असे त्या म्हणाल्या.
परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी म्हणाले की, गुरुवारी रात्री पाकिस्तानने केलेल्या या चिथावणीखोर आणि आक्रमक कारवायांमध्ये नागरी पायाभूत सुविधांव्यतिरिक्त भारतीय शहरे आणि लष्करी छावण्यांना लक्ष्य करण्यात आले. भारतीय सशस्त्र दलांनी प्रमाणबद्ध, पुरेसे आणि जबाबदारीने प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानने या हल्ल्यांना अधिकृत आणि स्पष्टपणे हास्यास्पद नकार देणे हे त्यांच्या ढोंगीपणाचे उदाहरण आहे, असे परराष्ट्र सचिव म्हणाले. आपल्या कृती मान्य करण्याऐवजी, पाकिस्तानने हास्यास्पद आणि अपमानजनक दावा केला आहे.
परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी म्हणाले की, सुरक्षेच्या कारणास्तव, कर्तारपूर साहिब कॉरिडोर पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आला आहे. या कॉरिडोरद्वारे शीख समुदाय गुरदासपूरहून पाकिस्तानमधील गुरुद्वारा कर्तारपूर साहिबला भेट देण्यासाठी जातो. याच ठिकाणी गुरू नानक देवजींनी त्यांच्या आयुष्यातील शेवटचे दिवस घालवले होते.