

Padma Awards 2026 announced
नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशातील मानाच्या 'पद्म' पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. सन २०२६ साठीच्या पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कारांच्या मानकरी ठरलेल्या ४५ मान्यवरांची यादी केंद्र सरकारने प्रसिद्ध केली आहे. विविध क्षेत्रांत अतुलनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींची या पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे.
यावर्षीच्या यादीत प्रकर्षाने दखल घेतली गेली आहे ती पडद्यामागे राहून समाजकार्य करणाऱ्या खऱ्या नायकांची. यामध्ये जगातील सर्वात मोठे 'फ्री-अॅक्सेस' ग्रंथालय उभारणारे माजी बस वाहक, आशियातील पहिली 'ह्यूमन मिल्क बँक' स्थापन करणाऱ्या बालरोगतज्ज्ञ आणि दुर्मिळ वाद्य जपणारे ९० वर्षीय आदिवासी कलाकार यांचा समावेश आहे.
अंके गौडा (कर्नाटक): ७५ वर्षीय माजी बस वाहक अंके गौडा यांनी पुस्तकांवरील प्रेमापोटी 'पुस्तक मने' हे ग्रंथालय उभारले. येथे २० भाषांमधील २० लाखांहून अधिक पुस्तके आणि दुर्मिळ हस्तलिखिते मोफत उपलब्ध आहेत.
डॉ. आर्मिडा फर्नांडिस (मुंबई): आशियातील पहिली 'ह्यूमन मिल्क बँक' स्थापन करून अर्भकांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी त्यांनी मोठे कार्य केले आहे.
इतर मान्यवर: मध्य प्रदेशचे बुंदेली युद्धकला प्रशिक्षक भगवानदास रायकवार, महाराष्ट्राचे ९० वर्षीय तारपा वादक भिकल्या लाडक्या धिंडा आणि जम्मू-काश्मीरचे समाजसेवक ब्रिज लाल भट्ट यांचाही यात समावेश आहे.
या व्यतिरिक्त, नक्षलग्रस्त भागांत शाळा उभारणाऱ्या बुद्री ताती, संथाली लेखक चरण हेम्ब्रम, पितळ कोरीव काम करणारे चिरंजी लाल यादव आणि मानवी स्थलांतराचा अभ्यास करणारे जनुकीय शास्त्रज्ञ कुमारसामी थंगराज अशा ४५ दिग्गजांच्या नावावर केंद्र सरकारने शिक्कामोर्तब केले आहे.
यावर्षीचे पद्म पुरस्कार भारताच्या कानाकोपऱ्यातील अशा नायकांना समर्पित करण्यात आले आहेत, जे प्रसिद्धीच्या झगमगाटापासून दूर राहून समाजकार्य करत आहेत. यात प्रामुख्याने उपेक्षित, मागास आणि दलित समुदाय, आदिम जमाती आणि दुर्गम भागातील व्यक्तींचा समावेश आहे. दिव्यांग, महिला, बालके आणि आदिवासींच्या उत्थानासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या या व्यक्तींनी आरोग्य सेवा, शिक्षण, उपजीविका, स्वच्छता आणि शाश्वत विकास या क्षेत्रांत मोलाचे योगदान दिले आहे. यावर्षी भगवादास रायकवार (मध्य प्रदेश) आणि ब्रिज लाल भट्ट (जम्मू-काश्मीर) यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी पद्मश्री जाहीर झाला आहे. छत्तीसगडच्या बुदरी थाटी आणि ओडिशाच्या चरण हेम्ब्रम, उत्तर प्रदेशातील चिरंजी लाल यादव आणि गुजरातचे धार्मिकलाल चुन्नीलाल पंड्या यांच्याही कार्याचा पद्म पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे.
१ ) अंके गौडा
२ )आर्मिडा फर्नांडिस
३) भगवानदास रायकर
४) भिखल्या लाडक्या धिंडा
५) ब्रिज लाल भट्ट
६) बुदरी थाटी
७) चरण हेम्ब्रोम
८) चिरंजी लाल यादव
९) धार्मिकलाल चुनीलाल पंड्या
१०) गफारुद्दीन मेवाती जोगी
११) हैली वार
१२) इंदरजित सिंग सिद्धू
१३) के. पझनिवेल
१४) कैलास चंद्र पंत
१५) खेमराज सुंद्रियाल
१६) कोल्लककायली देवकी अम्मा जी
१७) कुमारस्वामी थंगराज
१८) महेंद्र कुमार मिश्रा
१९) मीर हाजीभाई कासमभाई
२०) मोहन नगर
२१) नरेश चंद्र देव वर्मा
२२)निलेश विनोदचंद्र मांडलेवाला
२३) नुरुद्दीन अहमद
२४)ओथुवर तिरुथानी स्वामीनाथन
२५) पद्म गुरमीत
२६)पोखिला लेक्थेपी
२७)पुन्नियामूर्ती नटेशन
२८)आर. कृष्णन
२९)रघुपत सिंग
३०)रघुवीर तुकाराम खेडकर
३१)राजस्थापथी कैयप्पा गौंडर
३२)रामा रेड्डी मामिडी
३३)रामचंद्र गोडबोले आणि सुनीता गोडबोले
३४)एस.जी. सुशीला अम्मा
३५)संग्युसांग एस. पोंगेनोर
३६) शफी शौक
३७) श्रीरंग देवबा लाड
३८)श्याम सुंदर
३९)सिमंचल पात्रा
४०) सुरेश हंगावाडी
४१) टागा राम भील
४२)टेकी गुबिन
४३)तिरुवरुर भक्तवत्सलम
४४)विश्व बंधू
४५) युमनाम जत्रा सिंग
येत्या काळात राष्ट्रपती भवनात आयोजित विशेष नागरी सन्मान सोहळ्यात भारताचे राष्ट्रपती या मान्यवरांना सन्मानित करतील. समाजसेवा, कला, संस्कृती, शिक्षण, सार्वजनिक व्यवहार आणि आरोग्य अशा वैविध्यपूर्ण क्षेत्रांतील योगदानाबद्दल हे पुरस्कार प्रदान केले जातात. या पुरस्कारांच्या माध्यमातून तळागाळात काम करणाऱ्या व्यक्तींपासून ते राष्ट्रीय स्तरावरील व्यक्तिमत्त्वांपर्यंत सर्वांच्या सेवेची दखल घेण्यात आली आहे.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आज सकाळीच पोलीस, अग्निशमन दल, होमगार्ड, नागरी संरक्षण आणि सुधारात्मक सेवा विभागातील एकूण ९८२ जवानांना शौर्य आणि सेवा पदके जाहीर करण्यात आली आहेत.