

P Chidambaram 26/11 Mumbai Attack :
काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी चिदंबरम यांनी आज एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी पाकिस्ताननं २६/११ चा दहशतवादी हल्ला केल्यानंतर भारत सरकार लष्करी कारवाईचा विचार करत होतं मात्र आंतरराष्ट्रीय दबावामुळं तो विचार बारगळला असं सांगितलं. त्यांच्या या वक्तव्यामुळं सध्याच्या राजकीय वर्तुळात मोठा गदारोळ होण्याची शक्यता आहे. भारत - पाकिस्तान युद्ध ट्रम्प यांनी थांबवलं यावरून सुरू असलेल्या राजकीय आरोप प्रत्यारोपामध्ये चिदंबरम यांच्या या वक्तव्यानं भाजपला आयतं कोलीत मिळालं आहे.
काँग्रेस पक्षानं ऑपरेशन सिंदूर अचानक स्थगित केल्यानंतर सत्ताधारी भाजपवर मोठी टीका केली होती. अमेरिकेच्या इशाऱ्यावर भारतानं युद्ध थांबवलं. ट्रम्प यांनी टॅरिफ लावण्याची धमकी दिली म्हणून भारतानं माघार घेतली अशी टीका विरोधी पक्ष करत आहेत.
पी चिदंबरम हे काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युपीए सरकारमध्ये गृह मंत्री होते. त्यांनी एका हिंदी न्यूज चॅनलला मुलाखत दिली. त्यात ते म्हणाले की, 'संपूर्ण जग दिल्लीला (भारत सरकार) युद्ध सुरू करू नका असं सांगत होतं. यात अमेरिकेचे माजी सेक्रेटरी राईस यांचा देखील समावेश होता.
चिदंबरम म्हणाले, 'दोन तीन दिवसांनी काँडोलिझा राईस या मला आणि पंतप्रधानांना भेटण्यासाठी आल्या. त्या म्हणत होत्या कृपा करून युद्ध सुरू करू नका, मी म्हटलं हा निर्णय सरकार एकत्र मिळून घेईल. मात्र माझ्या मनात आपण पाकिस्तानला प्रत्युत्तर द्यावं असं आलं होतं.
चिदंबरम पुढे म्हणाले, 'पंतप्रधानांनी २६/११ चा हल्ला सुरू होता त्यावेळी देखील लष्करी कारवाईच्या पर्यायाची चर्चा देखील केली होती. मात्र परराष्ट्र खात्याचं म्हणणं होतं की आपण थेट युद्धात उतरू नये.
चिदंबरम यांच्या या मुलाखतीचा व्हिडिओ मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्विटरवर शेअर केला आणि माजी गृहमंत्री आणि त्यांच्या पक्षावर टीका केली आहे.