

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी ऑपरेशन ब्लू स्टारबाबत केलेल्या विधानामुळे काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. 1984 मध्ये अमृतसरमधील सुवर्णमंदिरातून खलिस्तानी दहशतवाद्यांना बाहेर काढण्यासाठी भारतीय सैन्याने केलेल्या ऑपरेशन ब्लू स्टारवर त्यांनी टीका केली. दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलताना चिदंबरम म्हणाले की, ‘ऑपरेशन ब्लू स्टार हे सुवर्णमंदिर वाचवण्याचा चुकीचा मार्ग होता आणि इंदिरा गांधींनी त्या चुकीची किंमत आपल्या प्राणांद्वारे मोजावी लागली.’
चिदंबरम म्हणाले की, ‘सैन्याच्या त्या कारवाईमुळे मंदिराची पवित्रता भंग झाली आणि अनेक निष्पाप जीव प्राणास मुकले. काही वर्षांनी आम्ही मंदिर पुन्हा ताब्यात घेण्यासाठी सैन्य न वापरता परिस्थिती हाताळली, पण केवळ इंदिरा गांधींनाच दोषी ठरवणे योग्य नाही. ती एक एकत्रित शिफारस होती. लष्कर, पोलिस, गुप्तचर यंत्रणा आणि नागरी प्रशासन यांनी मिळून घेतलेला तो निर्णय होता.’
चिदंबरम यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेस पक्षात अंतर्गत नाराजी निर्माण झाली आहे. अनेक वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या विधानाचा निषेध केला असून, काहींनी ते ‘भाजपसारखे बोलत आहेत,’ असा आरोप केला आहे. पक्षात अशीही भावना आहे की, चिदंबरम यांच्या विधानामुळे भाजपला काँग्रेसविरोधी राष्ट्रवादाच्या प्रचारासाठी नवे हत्यार मिळाले आहे. काँग्रेस नेतृत्व ‘अतिशय अस्वस्थ’ असल्याचे समजते. पक्षाच्या काही नेत्यांनी खासगीपणे तर काहींनी माध्यमांसमोर विरोध दर्शवला. भाजपने काँग्रेसवर ‘राष्ट्रवादविरोधी’ असल्याचा आरोप केला आहे.
ब्लू स्टारनंतर ‘ऑपरेशन वूडरोज’ राबवण्यात आले, जे ग्रामीण पंजाबमध्ये लपून बसलेल्या खलिस्तानी समर्थकांवर लक्ष केंद्रित करणारे होते. मात्र, ब्लू स्टारमध्ये जसे सैन्य मंदिरात घुसले होते, तसे वूडरोजमध्ये टाळण्यात आले. चिदंबरम यांनी याचेच उदाहरण देत ब्लू स्टार चुकीचे ठरवले.
ऑपरेशन ब्लू स्टार ही जून 1984 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आदेशाने राबवलेली लष्करी कारवाई होती. अमृतसरमधील सुवर्णमंदिरात लपून बसलेल्या खलिस्तानी दहशतवाद्यांना, जरनैलसिंग भिंद्रनवाले व त्याच्या अनुयायांना बाहेर काढण्यासाठी लष्कर उतरवण्यात आले. ही कारवाई अत्यंत भीषण होती. अकाल तख्तचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आणि मंदिराच्या पवित्र भागांवर गोळ्यांचे व दारूगोळ्याच्या खुणा उमटल्या. या कारवाईमुळे नागरिकांत संताप उसळला. त्याच वर्षी 31 ऑक्टोबरला इंदिरा गांधी यांची त्यांच्या शीख अंगरक्षकांकडून हत्या करण्यात आली. त्यानंतर संपूर्ण देशात भीषण शीखविरोधी दंगली झाल्या.