

नवी दिल्ली : माणसांशी आपला व्यवहार चांगला असला पाहिजे तसेच लोकांचे प्रश्न सोडवण्याची पद्धत चांगली असली पाहिजे. समाजाला अधिकाऱ्यांची माहिती देणारे 'आऊट ऑफ द बॉक्स' हे पुस्तक आहे. माणसाच्या जीवन मूल्यांचेही पुस्तक काढले पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. गौतम कोतवाल लिखित 'आऊट ऑफ द बॉक्स' पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला खा. भाऊसाहेब वाकचौरे, संरक्षण मंत्रालयाचे सल्लागार विनोद खंदारे, केंद्र सरकारमधील निवृत्त सचिव अरुण शर्मा उपस्थित होते. प्रशासकीय सेवेसह विविध सेवांमध्ये महाराष्ट्रातील ज्या अधिकाऱ्यांनी राज्याबाहेरच्या कॅडरमध्ये आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवला आहे, अशा कर्तृत्ववान अधिकाऱ्यांच्या कार्यकर्तृत्वाचे गौरव करणारे ‘आउट ऑफ द बॉक्स’ हे पुस्तक आहे. ‘आउट ऑफ द बॉक्स’ या पुस्तकात आयएएस संकेत भोंडवे, आयएएस डॉ. सागर डोईफोडे, आयपीएस मनोज चोथे, आयएएस विजय कुलांगे, आयएएस राजेश पाटील, आयपीएस महेश भागवत, आयएएस ॠषिकेश मोडक, आयपीएस संजय लाठकर, आयएफएस ज्ञानेश्वर मुळे, आयएएस ज्ञानेश्वर पाटील, आयपीएस डॉ. महेश दीक्षित, आयएएस संदीप कदम, आयसीएएस सुप्रिया देवस्थळी, आयएएस अय्याज तांबोळी, आयपीएस वैभव निंबाळकर, आयएएस रोहिणी भाजीभाकर, आयएएस डॉ. नितीन जावळे, आयपीएस सायली धुरत, सीआयएसएफ अभिषेक इंगळे, आयएएस अमित कांबळे यांच्या कार्याची ओळख करून दिली आहे.