

पुढारी ऑनलाईन डेस्क : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची प्रकृती खालावल्याने त्यांना गुरुवारी सायंकाळी दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. रात्री १० वाजता त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रात्री आठच्या सुमारास त्यांना एम्सच्या (दिल्ली एम्स) आपत्कालिन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
डॉ. सिंग यांनी सलग दोनवेळा देशाचे पंतप्रधानपद भूषवले आहे. त्यांनी 2004 ते 2014 दरम्यान काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारचे नेतृत्व केले. त्याआधी पी. व्ही. नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये त्यांनी 1991-96 या काळात अर्थमंत्री म्हणूनही काम केले होते. पी. व्ही. नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात भारताने उदारीकरण, खासगीकरण आणि जागतिकीकरण धोरण स्वीकारले. या सुधारणांचे प्रमुख शिल्पकार म्हणून मनमोहन सिंग यांना श्रेय दिले जाते. त्या काळात त्यांनी केलेल्या आर्थिक सुधारणा आणि त्यानंतर झालेल्या आर्थिक प्रगतीमुळे त्यांची ओळख अर्थतज्ज्ञ म्हणून देशाला झाली.