

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी लोकसभेत प्रचंड गदारोळ आणि घोषणाबाजी सुरू असतानाच तीन विधेयके सादर केली. याअंतर्गत, पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांवर गंभीर गुन्ह्याचा आरोप असल्यास आणि 30 दिवसांसाठी तुरुंगात जावे लागल्यास, त्यांना त्यांच्या पदावरून काढून टाकता येणार आहे. हे विधेयक सादर होताच विरोधकांनी जोरदार गदारोळ केला. एवढेच नव्हे, तर त्यांनी विधेयकाची प्रत फाडून अमित शहा यांच्या दिशेने भिरकावली. सभागृहातील गदारोळ एवढा वाढला की, मार्शल ताबडतोब शहा यांच्याकडे धावले आणि त्यांनी त्यांच्याभोवती सुरक्षा कडे तयार केले.
संविधान (130 वी दुरुस्ती) विधेयक, केंद्रशासित प्रदेश सरकार (दुरुस्ती) विधेयक आणि जम्मू-काश्मीर पुनर्रचना (दुरुस्ती) विधेयक, ही तीन विधेयके संसदेत सादर करण्यात आली. त्यापैकी संविधान (130 वी दुरुस्ती) या विधेयकातील तरतुदी अन्यायकारक असल्याचा आरोप करून विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला आणि विधेयकाच्या प्रती फाडल्या. विरोधकांनी विधेयक मागे घेण्याची जोरदार मागणी केली. विरोधकांनी विधेयकाची प्रत फाडल्यामुळे लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला नाराज झाले. त्यांनी खासदारांना असे न करण्याची सूचना केली. यादरम्यान अमित शहा आणि काँग्रेसचे खासदार के. सी. वेणुगोपाल यांच्यात तिखट वादावादीही झाली.
वेणुगोपाल म्हणाले, हे विधेयक संविधानाच्या मूलभूत तत्त्वांचे उल्लंघन करते. अमित शहा यांना गुजरातचे गृह राज्यमंत्री असताना अटक करण्यात आली तेव्हा त्यांनी नैतिकतेचे पालन केले होते का? यावर गृहमंत्री शहा म्हणाले, मला अटक होण्यापूर्वीच मी गुजरातच्या गृह राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. माझ्यावर खोटे आरोप लावण्यात आले होते. खटला सुरू होईपर्यंत मी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला. न्यायालयाने मला सर्व आरोपांमधून मुक्त करेपर्यंत, मी कोणतेही संवैधानिक पद भूषवले नाही.
विरोधी पक्षांच्या वतीने एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी, काँग्रेसचे मनीष तिवारी आणि के. सी. वेणुगोपाल, आरएसपीचे एन. के. प्रेमचंद्रन आणि समाजवादी पक्षाचे धर्मेंद्र यादव यांनी विधेयके सादर करण्यास विरोध केला. तसेच, नियमांनुसार, विधेयक सादर करण्याची सूचना सदस्यांना सात दिवस आधी देण्यात आली नाही आणि त्याच्या प्रतीदेखील वेळेवर वाटल्या गेल्या नाहीत, असे ते म्हणाले.
संविधान (130 वी दुरुस्ती) विधेयक अमित शहा यांनी सादर करताना ते 21 सदस्यांच्या ‘जेपीसी’कडे पाठवण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यावर आवाजी मतदान घेण्यात आले असता विरोधी खासदारांनी वेलमध्ये उतरून गोंधळ घातला. तथापि, प्रस्ताव आवाजी मतदानाने मंजूर होऊन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी, राजकारणात नैतिकता गरजेची आहे, असे सांगत हे विधेयक ‘जेपीसी’कडे चर्चेसाठी पाठवले.
संसदेतील गदारोळ वाढत असतानाच, केंद्रीय मंत्री रवनीतसिंह बिट्टू आणि किरेन रिजिजू यांच्यासह काही भाजप सदस्य अमित शहा यांच्याजवळ आले. यानंतर विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षाच्या खासदारांमध्ये बाचाबाची झाली. त्याचवेळी तीन मार्शल्सनी शहा यांच्याकडे धाव घेत, त्यांच्याभोवती सुरक्षा कडे तयार केले. यानंतर, सभागृह तहकूब झाले. मात्र, त्यानंतरही विरोधी सदस्य घोषणाबाजी करत होते.