

नवी दिल्ली : शिवसेना ठाकरे गटाच्या ६ खासदारांनी आपल्या पक्षाविरोधात बंड केले. या ६ खासदारांनी संसदीय पक्षाने बोलावलेल्या बैठकीत अनुपस्थित राहून बंडावर शिक्कामोर्तब केले. ऑपरेशन टायगरच्या चर्चा झाल्यानंतर ६ खासदार नॉट रीचेबल झाले. त्यानंतर त्यांनी लोकसभा अध्यक्षांना गट स्थापनेचे पत्र दिल्याचा दावा शिवसेना शिंदे गटाने केला. मात्र लोकसभा अध्यक्ष कार्यालयाने या गोष्टीला अद्याप दुजोरा दिला नाही. त्यामुळे नेमके पत्र कुठे अडकले अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या ६ बंडखोर खासदारांना गट स्थापन करून शिंदेंच्या शिवसेनेत जायचे असल्याचे समजते. असे करताना त्यांना बऱ्याच मोठ्या कायदेशीर प्रक्रियेतून जावे लागणार आहे. दुसऱ्या बाजूला शिवसेना ठाकरे गटाने त्यांच्यावर कारवाईचा इशारा आधीच दिला आहे. संसदीय पक्षाच्या बैठकीला अनुपस्थित राहिल्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून त्याचे उत्तर त्यांना ७ दिवसात द्यायचे आहे.
या सर्व बाबींचा विचार करून बंडखोर खासदारांचा गट कायदेशीर बाबी पूर्ण करण्यासाठी वेळ घेत असल्याची शक्यता आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीवर सगळी तयारी झालेली आहे आणि खासदारांनी त्यांच्या सह्यांचे पत्र लोकसभा अध्यक्षांना दिल्याचा दावा शिवसेना शिंदे गटाच्या वतीने केला जात आहे. या संदर्भात बंडखोर खासदारांपैकी सर्वांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता सर्वच्या सर्व नॉट रीचेबल आहेत. दुसऱ्या बाजूला लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयाकडे यासंदर्भात विचारणा करण्यात आली असता कार्यालयाने पत्र आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. त्यामुळे पत्र नेमके कुठे अडले आणि कोणाची बाजू खरी समजावी, यावरून अनेक प्रश्न उपस्थित होतात.
बंडखोर खासदारांकडे ७ दिवसांचा वेळ
१८ जून रोजी शिवसेना ठाकरे गटाच्या संसदीय पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीला अनुपस्थित राहिल्यामुळे ७ दिवसात कारणे दाखवा नोटिसीला उत्तर द्यायचे आहे. थोडक्यात, बंडखोर खासदारांना जे काही करायचे आहे ते या ७ दिवसांमध्ये म्हणजे २५ जूनपर्यंत करायचे आहे. त्यानंतर ठाकरे गट कायदेशीर कारवाईचा पर्याय अवलंबेल, यासाठी आधीच त्यांनी कायदेतज्ञांशी चर्चा सुरू केली आहे.
२ दिवसात सर्व चित्र स्पष्ट दिसेल
बंडखोर खासदारांच्या गटाकडे ७ दिवसांचा अवधी असताना अवघ्या २ दिवसात सर्व चित्र स्पष्ट दिसेल, एकत्र फोटो पत्र आणि सगळ्याच गोष्टी दिसतील, असा मोठा दावा शिंदे गटाच्या वतीने सातत्याने करण्यात येत आहे. त्यामुळे येत्या रविवार - सोमवारपर्यंत याबाबतचे चित्र अधिकृतपणे स्पष्ट होण्याची शक्यता आहे.