

Operation Sindoor Update
नवी दिल्ली ः भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानने भारतातील उत्तर आणि पश्चिम भागातील अनेक भागात ड्रोन आणि मिसाईलद्वारे हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण, पाकिस्तानचे ड्रोन्स आणि मिसाईल भारतीय एअर डिफेन्स प्रणालीने हवेतच नष्ट करत हा हल्ला हाणून पाडला.
त्यानंतर भारताने याला प्रत्युत्तर म्हणून लाहोरमधील पाकिस्तानचे एअर डिफेन्स सिस्टिम उद्धवस्त करून टाकली.
परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने झालेल्या पत्रकार परिषदेत सचिव विक्रम मिसरी, कर्नल सोफिया कुरेशी, विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी ही माहिती दिली.
परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी म्हणाले, 22 एप्रिलच्या पहलगाम हल्ल्यापासून तणाव सुरू झाला. त्याला आम्ही प्रत्युत्तर दिले आहे. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत पाकिस्तानने निवेदन करताना TRF च्या नावाला विरोध दर्शवला होता.
भारताने केवळ दहशतवादी तळांना लक्ष्य केले होते. पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय स्तरावर संयुक्त चौकशी समितीची मागणी केली. पण पाकिस्तानचे ट्रॅक रेकॉर्ड पाहिले तर आम्ही मुंबईवरील हल्ला, पठाणकोट येथील फॉरेन्सिक पुरावे दिले. दोषींवर कारवाईची मागणी केली.
पाकने जेव्हा लष्कर ए तय्यबाच्या दहशतवाद्यांना पकडले तेव्हा सर्व पुरावे दिले. पण पाकिस्तानने काहीही केले नाही.
पठाणकोट हल्ल्यानंतर संयुक्त चौकशी समिती बनवली होती. आम्ही जैश ए मोहम्मदचे सर्व तपशील दिला. पुरावे दिले. पण तरीही पाकिस्तानने काहीही कारवाई केली नाही.
संयुक्त चौकशी समितीचा दावा करणे ही पाकिस्तानची Delay Tactics चा भाग आहे. दहशतवाद्यांना पाठीशी घालण्याचा हा प्रकार आहे.
MEA च्या प्रेस ब्रीफिंग मध्ये विक्रम मिसरी म्हणाले की, ''ओसामा बिन लादेन कुठे सापडला होता हे सर्वांना माहिती आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांचा सन्मान केला जात आहे.
पाकिस्तानचे अधिकारी दहशतवाद्यांना सन्मानदेत आहेत. भारत केवळ हल्ल्याला प्रत्युत्तर देत आहे. तणाव वाढविण्याचे प्रयत्न पाकिस्तानकडून सुरू आहेत. TRF ने हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. पाकिस्तानी लष्करप्रमुखांनी धार्मिक वक्तव्य केले होते.
मिसरी म्हणाले, ''आमच्या धार्मिक स्थळांना पाकिस्तानने लक्ष्य केले आहे. आम्ही दहशतवादी तळांना लक्ष्य केले होते. जम्मू काश्मीरमधील पूंछ येथील गुरुद्वाराला पाकने लक्ष्य केले.
सीमेवर नियंत्रण रेषेवर पाककडून गोळीबार केला जात आहे. पाकिस्तानच्या हल्ल्यात आत्तापर्यंत 16 सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानची कृती आम्हाला भडकवणारी आहे. आम्ही पाकिस्तानला प्रत्युत्तर देत आहोत.
कर्नल सोफिया कुरेशी यांनी यांनी सांगितले की, ऑपरेशन सिंदूर नंतर आम्ही स्पष्ट केले होते की, आम्ही पाकिस्तानातील सैन्य आणि नागरी ठिकाणांना लक्ष्य केलेले नाही. तेव्हाच हेदेखील स्पष्ट केले होते की, भारतातील सैन्य ठिकाणांवर हल्ला झाला तर त्याचे योग्य प्रत्युत्तर दिले जाईल.
7-8 मे च्या रात्री भारताच्या उत्तर आणि पश्चिम भागातील अनेक सैन्य ठिकाणांवर ड्रोन आणि मिसाईलद्वारे हल्ल्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला.
अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपुर, भठिंडा, चंडीगड, नाल, फलोदी, उत्तरलाई आणि भुज यासह उत्तर आणि पश्चिम भागातील अनेक लष्करी ठिकाणांवर हल्ल्याचा प्रयत्न झाला. पण इंटिग्रेटेड काऊंटर यूएएस ग्रिड आणि हवाई संरक्षण प्रणालीद्वारे हा हल्ला निष्प्रभ केला गेला. अनेक ठिकाणी मिळालेले अवशेष हे पाकिस्तानच्या हल्ल्याचे पुरावे आहेत.
आज सकाळी भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानच्या अनेक ठिकाणांवरील एअर डिफेन्स सिस्टिमवर हल्ला चढवला. लाहोरमधील पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टिम उद्धवस्त करण्यात आली आहे.
विंग कमांडर व्योमिका सिंह म्हणाल्या, पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर गोळीबार तीव्र केला आहे. अनेक ठिकाणी मोर्टार तोफांचा वापर केला जात आहे. यात भारतातील निष्पाप 16 जणांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानने भारतातील एकूण 15 ठिकाणी हल्ल्याचा प्रयत्न केला होता. पण तो प्रयत्न भारताने हाणून पाडला.
जम्मू काश्मिरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 26 जण ठार झाले. याचा बदला मंगळवारी रात्री भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून घेतला.
या ऑपरेशनमध्ये केवळ 25 मिनिटांत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरमधील 9 ठिकाणांवर हल्ले करण्यात आले. यात 100 दहशतवाद्यांचा खात्मा झाला.
दरम्यान, या हल्ल्यात भारताने पाकिस्तानच्या नागरी तसेच लष्करी ठिकाणांना टारगेट केले नव्हते. तरीही पाकिस्तानने आज बुधवारी भारतातील ठिकाणे टारगेट करण्याचा प्रयत्न केला.