

Operation Sindoor soldiers honor
नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरमधील सैनिकांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी राजधानी दिल्लीमध्ये मंगळवारी तिरंगा यात्रा काढण्यात आली. यावेळी कर्तव्यपथावर तिरंगा हातात घेऊन नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाजपने, मंगळवारी देशव्यापी तिरंगा यात्रा सुरू केली. भारतीय सैनिकांच्या शौर्याचा सन्मान करण्यासाठी आणि ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल नागरिकांना माहिती देणे, हा यात्रेचा उद्देश आहे. भाजपची 'तिरंगा यात्रा' २३ मे पर्यंत सुरू राहील. पहिल्याच दिवशी दिल्लीसह देशातील विविध ठिकाणी तिरंगा यात्रा काढण्यात आली.
दिल्लीतील तिरंगा यात्रेमध्ये मुख्यमंत्री रेखा गुप्ता, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि तरुण चुघ, दिल्ली भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा आणि इतर वरिष्ठ नेते आणि कार्यकर्ते या यात्रेत सामील झाले. यात्रेची सुरुवात कर्तव्यपथापासून झाली आणि राष्ट्रीय युद्ध स्मारकावर संपली. भाजप कार्यकर्ते, नागरिक, स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक संघटनांसह हजारो लोक सशस्त्र दलांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जमले होते.
सूत्रांनुसार, माजी सैनिक, सामाजिक कार्यकर्ते आणि प्रमुख व्यक्ती विविध राज्यांमध्ये तिरंगा यात्रेचे नेतृत्व करतील. एकता, देशभक्ती आणि राष्ट्रीय अभिमानाचा संदेश यात्रेतून दिला जाणार आहे. यात्रेच्या तयारीसाठी, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी १२ मे रोजी पक्षाच्या मुख्यालयात सरचिटणीसांसह एक महत्त्वाची बैठक घेतली.
संबित पात्रा, विनोद तावडे आणि तरुण चुघ यांच्यासह वरिष्ठ नेत्यांना प्रदेशांमधील यात्रेचे समन्वय साधण्याचे काम सोपवण्यात आले आहे. तसेच ऑपरेशन सिंदूरसंदर्भात देशभरात पत्रकार परिषदा घेण्याची भाजप रणनिती आखत आहे.