

Operation Sindoor Indian Army Dinesh Kumar Sharma
नवी दिल्ली : भारताच्या संरक्षण दलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने बुधवारी सीमा रेषेवर गोळीबार केला. या गोळीबारात भारतीय सैन्यातील जवान दिनेश कुमार सिंह हे शहीद झाले. दिनेश कुमार हे सकाळी जखमी झाले होते, संध्याकाळी उशिरा उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. हरयाणाचे मुख्यमंत्री नायबसिंह सैनी यांनी दिनेश कुमार यांच्या निधनावर शोक व्यक्त करत हरयाणाच्या जनतेला तुमचा अभिमान आहे, अशी पोस्ट X (आधीचे ट्विटर) या समाजमाध्यमावर केली आहे.
भारताच्या संरक्षण दलांनी बुधवारी मध्यरात्री पाकिस्तानमध्ये घुसून हवाई हल्ले केले. यात दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त करण्यात आले. इतकंच नव्हे तर भारताने या हल्ल्याचे पुरावेच जगासमोर मांडत पाकिस्तानचे अक्षरश: वाभाडे काढले. यामुळे खवळलेल्या पाकिस्तानने कुरापती सुरू केल्या आणि बुधवारी सकाळी सीमारेषेवर पाक सैन्याने गोळीबार केला. भारतानेही याला चोख प्रत्युत्तर दिले. मात्र, यादरम्यान सैन्याचे जवान दिनेश कुमार शर्मा हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते, संध्याकाळी उशिरा उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. पूंछ येथील कृष्णा घाटी सेक्टर येथे ते तैनात होते.
लान्स नायक दिनेश कुमार शर्मा हे मूळचे हरयाणातील पलवाल येथील रहिवासी होते. मुख्यमंत्री नायबसिंह सैनी X वर पोस्ट केलीये. ते म्हणतात, ऑपरेशन सिंदूरनंतर आज सकाळी जम्मूतील पूंछ येथे पाकिस्तान सैन्याच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना हरयाणातील पलवालचे सुपूत्र दिनेश कुमार शर्मा यांनी बलिदान दिले. तुम्ही दाखवलेल्या शौर्यावर देशाला अभिमान आहे. तुमच्या बलिदानाला हा देश कधीही विसरणार नाही.
दिनेश कुमार शर्मा हे 2014 मध्ये भारतीय सैन्यात भरती झाले होते. 11 वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी देशाच्या विविध भागांमध्ये काम केले. सध्या ते पूंछ येथे कार्यरत होते. नुकतीच त्यांना लान्स नायक पदावर बढती मिळाली होती. शर्मा यांना चार भावंडं असून त्यांचे दोन भाऊ सैन्यातच कार्यरत आहे. त्यांची पत्नी सीमा या वकील असून त्यांना दोन मुलं आहेत.
सीमारेषेवरील गावांतील रहिवाशांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर
भारत- पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर राजौरी जिल्हा प्रशासनाने सीमा रेषेजवळील गावांमधील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी संध्याकाळी चारच्या सुमारास प्रशासनाने नागरिकांना सुरक्षितस्थळी जाण्याच्या सूचना दिल्या. बैनग्लाड, फकीरा चक, सधवाल, जराई अशा एकूण १५ गावांसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे.