

जयपूर; वृत्तसंस्था : ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू करण्यामागे फक्त गोंधळ निर्माण करणे हा आमचा उद्देश नव्हता. तर परिस्थितीत बदल घडवणे हेच ध्येय होते. ‘ऑपरेशन सिंदूर’ हा शेवट नव्हता, ती फक्त सुरुवात होती. भारताची दहशतवादाविरोधातील लढाई भविष्यातही कठोरपणे सुरू राहील, असे ठाम प्रतिपादन तत्कालीन डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी केले.
भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ला गुरुवारी एक वर्ष पूर्ण झाले. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सशस्त्र दलांनी 7 मे 2025 रोजी पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर मोठी कारवाई केली होती. या कारवाईत लष्कर, वायुदल आणि नौदलाने संयुक्तपणे सहभाग घेतला होता. या वर्षपूर्ती दिनानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत लेफ्टनंट जनरल घई बोलत होते.
घई यांनी सांगितले की, भारत आपल्या सार्वभौमत्वाचे, सुरक्षेचे आणि नागरिकांचे संरक्षण अत्यंत जबाबदारीने करेल. ‘ऑपरेशन सिंदूर’ हा भारताच्या सामरिक प्रवासातील निर्णायक टप्पा असून, नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमापार जाऊन दहशतवादी तळांवर अचूक हल्ले करणे हा भारताच्या धोरणातील मोठा बदल आहेे. त्यांच्या मते, केंद्र सरकारने सैन्याला निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले. याच समन्वयामुळे कारवाई यशस्वी झाली. घई यांनी सांगितले की, गुप्तचर यंत्रणांनी अचूक माहिती पुरवली, सायबर आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर युनिटस्नी माहितीवर नियंत्रण ठेवले, तर सरकारने आंतरराष्ट्रीय आणि अंतर्गत परिस्थिती प्रभावीपणे हाताळली.
सरकारकडून सैन्याला सलाम; पंतप्रधान मोदींसह सर्व मंत्र्यांनी बदलला प्रोफाईल फोटो
‘ऑपरेशन सिंदूर’च्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सरकारच्या सर्व मंत्र्यांनी गुरुवारी आपल्या ‘एक्स’ अकाऊंटचा डिस्प्ले फोटो बदलून ‘ऑपरेशन सिंदूर’चा फोटो लावला आहे. याद्वारे सरकारने भारतीय सशस्त्र दलांच्या शौर्य, पराक्रम आणि साहसाला वंदन केले. पंतप्रधान मोदींनी ‘एक्स’वर लिहिले की, ‘ऑपरेशन सिंदूर’ हे भारताचे दहशतवादाच्या विरोधातील कठोर धोरण आणि राष्ट्रीय सुरक्षेप्रति असलेल्या अढळ वचनबद्धतेचे प्रतीक बनून समोर आले आहे. या मोहिमेने भारतीय सैन्याची व्यावसायिक क्षमता, तयारी आणि परस्पर समन्वय जगासमोर मांडला. त्याचबरोबर ही मोहीम संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर भारतच्या वाढत्या ताकदीचेही दर्शन घडवते. भारताचा दहशतवाद आणि त्याची संपूर्ण यंत्रणा नष्ट करण्याचा संकल्प आजही तितकाच ठाम आहे, असा पुनरुच्चार त्यांनी केला.