

पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केला तर भारतीय सैन्यही त्याला प्रत्युत्तर देईल. पण जर पाकिस्तान थांबला तर भारतही थांबेल. 'ऑपरेशन सिंदूर' सुरू करताना पाकिस्तानलाही हाच संदेश देण्यात आला होता, ज्याकडे त्यांनी त्यावेळी दुर्लक्ष केले.
तांत्रिक कारणांमुळे हॉटलाइनद्वारे भारताशी संपर्क साधता न आल्याने पाकिस्तानने त्याच दिवशी पहाटे 12:37 वाजता या संभाषणाची विनंती केली. त्यानंतर भारतीय डीजीएमओ यांच्या उपलब्धतेनुसार दुपारी 15:35 वाजता कॉल करण्याचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले. भारताने स्पष्ट केले की, त्याच दिवशी सकाळी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या प्रमुख हवाई तळांवर अत्यंत प्रभावी हल्ले केले. भारतीय लष्कराच्या ताकदीमुळेच पाकिस्तानला गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्यास भाग पाडले.
10 मे रोजी भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओ यांच्यामध्ये झालेल्या चर्चेनंतर शस्त्रसंधीवर सहमती झाल्याचेही परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले. पाकिस्तानकडून हल्ला झाल्यास जोरदार प्रत्युत्तर देऊ, असा इशारा देण्यात आला.
पत्रकार परिषदेत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, पाकिस्तानला बेकायदेशीरपणे व्यापलेले काश्मीर (पीओके) रिकामे करावे लागेल. हे भारताचे बऱ्याच काळापासूनचे धोरण आहे आणि त्यात कोणताही बदल झालेला नाही.
जम्मू आणि काश्मीरशी संबंधित कोणताही मुद्दा केवळ भारत आणि पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय चर्चेतूनच सोडवला जाईल. त्यात कोणत्याही तिसऱ्या पक्षाची भूमिका राहणार नाही. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे मंगळवारी पत्रकार परिषदेत हे पुन्हा स्पष्ट केले.
ऑपरेशन सिंदूरद्वारे, तुम्ही देशाचे मनोबल वाढवले आहे. देशाला एकतेच्या धाग्यात बांधले आणि भारताच्या सीमांचे रक्षण केले आहे. तुम्ही भारताच्या स्वाभिमानाला नवीन उंची मिळवून दिली. तुम्ही जे केले आहे ते अभूतपूर्व, अकल्पनीय, आश्चर्यकारक आहे, असे पीएम मोदी यांनी आदमपूर हवाई तळावर जवानांना संबोधित करताना म्हटले आहे.
आजपासून अनेक दशकांनंतरही, जेव्हा भारताच्या या पराक्रमाची चर्चा होईल, तेव्हा तुम्ही आणि तुमचे सहकारी त्यातील सर्वात प्रमुख अध्याय असाल. तुम्ही सर्वजण देशाच्या वर्तमानासह भावी पिढ्यांसाठी एक नवीन प्रेरणा बनला आहात- पीएम मोदी
ऑपरेशन सिंदूर ही सामान्य सैन्य कारवाई नाही. तर हे भारताच्या धोरणाचे, हेतूंचे आणि निर्णय क्षमतेचा संगम आहे- पीएम मोदी
आदमपूर हवाई तळावर जवानांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "मी अभिमानाने सांगू शकतो की तुम्ही सर्वांनी तुमचे लक्ष्य परिपूर्णतेने साध्य केले. पाकिस्तानातील केवळ दहशतवादी तळ आणि त्यांचे हवाई तळ उद्ध्वस्त झाले नाहीत तर त्यांचे नापाक मनसुबे उधळून लावले."
जेव्हा भारतीय सैनिक भारत माता की जय...असा जयघोष करतात तेव्हा शत्रूचे हृदय थरथर कापते. जेव्हा आपले ड्रोन शत्रूच्या किल्ल्याच्या भिंती उद्ध्वस्त करतात, जेव्हा आपली क्षेपणास्त्रे त्यांच्या लक्ष्यावर पोहोचतात तेव्हा शत्रूला, 'भारत माता की जय...' चा आवाज ऐकू येतो, असे पीएम मोदी म्हणाले.
आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदमपूर हवाई तळावर जाऊन तेथील शूर जवानांशी संवाद साधला. पीएम मोदी यांचे आदमपूर हवाई तळावरील संबोधन आज दुपारी ३:३० वाजता प्रसारित केले जाणार आहे.
आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आदमपूर हवाई तळावर पोहोचले. तेथे त्यांनी हवाई दलातील कर्मचाऱ्यांशी आणि शूर जवानांशी संवाद साधला.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सीडीएस जनरल चौहान आणि इतर वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांसोबत आज (दि. १३) राष्ट्रीय सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला.
दक्षिण काश्मीर जिल्ह्यातील शुक्रू केलर भागात दहशतवाद्यांनी आश्रय घेतला असल्याची माहिती सुरक्षा दलांनी मिळाली. तत्काळ या परिसराला घेराव घालत सुरक्षा दलांनी शोध मोहीम राबवल्याचे वृत्त 'पीटीआय'ने दिले आहे.
पाकिस्तानला लगतच्या राज्यांमधील सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये परिस्थिती सामान्य आहे. जम्मू-काश्मीरमधील रियासीमध्ये शाळा पुन्हा सुरू झाल्याचे वृत्त ANIने दिले आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या कारवाया फक्त स्थगित ठेवण्यात आल्या आहेत. भविष्य त्यांच्या वर्तनावर भारताची कारवाई अवलंबून असेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी देशवासीयांना संबोधित करताना स्पष्ट केले. मात्र यानंतर काही तासांमध्येच सांबा आणि कठुआ जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागात ड्रोन दिसले. मात्र सीमेवरील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे भारतीय लष्कराने स्पष्ट केले आहे. विमान वाहतूक कंपन्या इंडिगो आणि एअर इंडियाने यानंतर एक मोठे पाऊल उचलले असून, आज जम्मू, श्रीनगर, लेह, चंदीगड आणि राजकोट आणि अमृतसरला जाणाऱ्या सर्व उड्डाणे रद्द केली आहेत.
भारतीय लष्कराने माहिती दिली आहे की, सध्या तरी सीमेवर पाकिस्तानकडून कोणत्याही हालचाली दिसून आलेल्या नाहीत. हालचाली दिसून आलेल्या नाहीत. परिस्थिती पूर्णपणे शांत आणि नियंत्रणात आहे. लष्कर परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे.