

नवी दिल्ली : भारत पाकिस्तान युद्धानंतर युद्धविरामानंतर आता काँग्रेसकडून सवाल उपस्थित केले जात आहेत. भारताच्या जनतेला आणि सैन्याला विश्वासात न घेता गंभीर राष्ट्रीय मुद्द्यांवर परदेशातून घोषणा का केल्या गेल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी अजूनही या गोष्टीवर मौन का बाळगत आहेत. असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे. काँग्रेस खासदार जयराम रमेश यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत हे सवाल केले. पुढे त्यांनी म्हटले की काँग्रेस देशाच्या सैन्यासोबत खडकासारखे उभे आहोत पाकिस्तानविरुद्ध केलेल्या लष्करी कारवाईला आमचा पूर्ण पाठिंबा आहे.
पुढे त्यांनी पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर याबाबत सर्वपक्षीय बैठकीची मागणी केली. यापाठीमागील बैठकीला पंतप्रधान उपस्थित नव्हते त्यामुळे काँग्रेस अध्यक्ष मल्ल्किार्जून खरगे व विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी मोदी यांना पत्र पाठवून सर्वपक्षीय बैठकीची मागणी केली.
पुढे बोलताना जयराम रमेश यांनी प्रश्न उपस्थित केला की, पंतप्रधान २५ तारखेला फक्त एनडीए शासित मुख्यमंत्र्यांचीच बैठक का घेत आहेत, देशभरातील सर्व मुख्यमंत्र्यांना का बोलावले नाही? ते म्हणाले की पंतप्रधान सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राहत नाहीत, विरोधकांच्या पत्रांना उत्तर देत नाहीत आणि नंतर फक्त एनडीए नेत्यांसोबत बैठका घेतात आणि देशभरात रॅली काढतात, हे बरोबर आहे का?
पुढे त्यांनी म्हटले की भारत पाक युद्धविरामाची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कसे करतात. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनीही अमेरिकेमुळे हे युद्ध थांबल्याचे म्हटले. या गोष्टीवर पंतप्रधान मोदी आणि परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यावर गप्प का आहेत? असा सवालही त्यांनी केला.
काँगेस नेते पवन खेडा यांनी सांगितले की १५ दिवसांत काँग्रेसचे तिसरी बैठक पार पडली. तसचे याबाबतीत शुक्रवारी राहुल गांधी हे प्रेस कॉन्फरंस घेणार आहेत. तसेच येत्या काही दिवसात काँग्रेस देशभरात जय हिंद रॅली काढणार आहे. तसेच ऑपरेशन सिंदूर एका पक्षाची जहागिरी नाही तर देशाचा ब्रॅन्ड आहे असेही यावेळी काँग्रेसने टीका केली.